कोल्हापूर : उर्वरित ‘एफआरपी’तील रक्कम देण्यास कारखान्यांकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना तेवढ्या रकमेची साखर दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन साखर कारखानदारांनी केले आहे. याबाबत कोल्हापुरात साखर कारखानदारांची बैठक झाली; यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.एकरकमी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांकडे पैसे नाहीत. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने साखर आयुक्तांनी कारखान्यांवर महसूल कारवाईचा बडगा उगारला आहे. यातून सुटण्यासाठी कारखानदारांनी ‘स्वाभिमानी’ची मागणी मान्य करीत ‘एफआरपी’तील उर्वरित रकमेऐवजी साखर देण्याची तयारी दर्शविली आहे.
याबाबत कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली. यामध्ये साखर घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बहुतांश कारखान्यांनी जाहीर निवेदनाद्वारे आपापल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
सात दिवसांत शेतकऱ्यांनी साखर पाहिजे असल्याची लेखी मागणी अर्ज विहित नमुन्यात कारखान्यांच्या शेती कार्यालयात जमा करावेत. साखर मागणीचे लेखी अर्ज प्राप्त झाले नाहीत तर कारखान्यांकडून रक्कम उपलब्धतेनुसार उर्वरित एफआरपीचे पैसे देण्यात येतील, असे कारखान्यांनी आवाहन केले आहे. तसा नमुना एकत्रित तयार करून कारखान्यांनी स्वतंत्ररीत्या प्रसिद्धीस दिला आहे.बैठकीला माजी मंत्री व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह जिल्ह्यातील कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते.