आॅनलाईन लोकमतपाचवड (सातारा), दि. 0६ : बळीराजाच्या न्याय्य मागण्या सरकारने मंजूर कराव्यात यासाठी पाचवड येथे मंगळवारी भरणारा भाजीपला व जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. पाचवड येथील शेतकऱ्यांनी शेतकरी संप सुरू झाल्यापासूनच बाजारबंदची हाक दिली असतानाही काही व्यापाऱ्यांनी दंडेलशाहीचा वापर करून बाजार भरवण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना चांगलाच दणका देत बाजार बंद केला.
दंडेलशाही करून बाजार भरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकरी हिसका दाखवून शेतकरी विरोधी भाजपा सरकारच्या विरोधात निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली.
उडतारे येथील जाळपोळ व पाचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना व मित्र पक्षांनी केलेला महामार्ग रोको यामुळे पाचवड व परिसरात शेतकरी संपाची दाहकता वाढली असतानाच काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना न जुमानता पाचवड येथे बाजार भरवण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भाजीपाला बाजाराच्या ठिकाणी जाऊन सुरवातीला व्यापाऱ्यांना विनंती केली मात्र व्यापारी दंडेलशाही करीत असल्याचे लक्षात आल्यावर जमलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत बाजार बंद पाडला.
शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून सर्व व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याचे कॅरेट तेथेच रिकामी करून पोबारा केला. तसेच जनावरांचा बाजारही पूर्णत: बंद ठेवण्यात आला.