जहाँगीर शेखकागल: तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्स रक्कमेची माहिती देण्यासाठी कारखान्याचे शेकडो मुश्रीफ समर्थक सभासद शेतकरी आज मुबंईतील ईडी कार्यालयात गेले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान येथे सोडले. यावेळी माजी जि.प सदस्य युवराज पाटील, सतीश पाटील गिजवणेकर, मनोज फराकटे, माजी नगराध्यक्ष नवल बोते, प्रविणसिह भोसले, संजय चितारी आदी शेकडो कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. संजय चितारी, अॅड जीवन शिंदे, संग्राम पाटील यांना ईडी कार्यालयात प्रवेश देण्यात आला. त्यांनी आम्ही हजारो लोकांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी पैसे मदत म्हणून दिले आहेत. आम्हाला या बदल्यात साखर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध सुविधा मिळतात. मुठभर लोकांसाठी कारवाई करू नये असे सांगितले. तसेच दोनशे शेतकऱ्यांनी याबाबत अर्जही ईडी कार्यालयात दिले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचे समर्थक विवेक कुलकर्णींसह सोळा जणांनी शेअर्सच्या रक्कमेबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मुरगुड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ईडीने या अनुषंगाने तपास करीत मुश्रीफ यांची चौकशी सुरू केली आहे. तर, कारखान्याचे सभासद संजय चितारी यांनीही विवेक कुलकर्णी आणि अन्य काही जणाविरूद्ध मुरगुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यातच, घोरपडे कारखान्याच्या सभासदांच्यावतीने बाजू मांडण्यासाठी मुश्रीफ समर्थक सभासद मुंबईला गेले. मुंबई पोलिसांनी संजय चितारी व अन्य चार जणांना ईडी कार्यालयात प्रवेश दिला. इतरांना आत येवू दिले नाही. तसेच घोषणाबाजीसही प्रतिबंध केला.
आमदार हसन मुश्रीफांच्या समर्थनार्थ कागलमधील शेतकरी थेट ईडी कार्यालयात; पोलिसांनी घेतलं ताब्यात, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 3:59 PM