कडगाव : शेळ्या चारायला गेलेल्या शेतकर्यावर गव्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार झाला. भाऊ विष्णू शिंदे (वय ६0) असे या शेतकर्याचे नाव आहे. ही घटना देवर्डे (ता. भुदरगड) येथे काल, सोमवारी सायंकाळी घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भाऊ शिंदे हे गावाशेजारील ‘वडाचा माळ’ या शेतामध्ये शेळ्या चारायला गेले होते. सायंकाळी शेळ्या घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. तेव्हा त्यांचा मृतदेह करवंदीच्या झुडुपात सापडला. यावरून शेतामध्ये शिंदे यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे दिसून आले. गव्याचे शिंग त्यांच्या पोटात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कडगाव वन विभागाचे क्षेत्रपाल अ. सी. जखन्नवार, वनरक्षक ए. डी. राऊत, एस. एस. जोतकर, पी. एस. मेंगाणे, बी. बी. न्हावी यांनी घटनास्थळी भेट दिली. शिंदे यांची परिस्थिती बेताची असून, त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. तालुक्यात अशा वनप्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By admin | Published: May 28, 2014 1:01 AM