कोल्हापूर : ऊस गाळप केल्यापासून १४ दिवसांच्या आत नियमाप्रमाणे ‘एफआरपी’ न दिलेल्या साखर कारखान्यांवर प्रशासक नेमावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेतर्फे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या येथील घरापासून शंभर मीटरवर गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, दुपारी सव्वाचारच्या सुमारास पोलिसी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ दिनकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक गनिमीकाव्याने पोलिसांना चकवा देत पालकमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरापर्यंत बैलगाडीसह जाऊन पोहोचले. यामुळे घरापर्यंत पोहोचू न देण्याचे पोलिसांचे नियोजन फसले.मंत्री पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून सकाळी सहा वाजता आंदोलक कोल्हापुरात दाखल झाले. पोलीस बंदोबस्ताचा अंदाज घेऊन ते गटागटाने संभाजीनगरात गेले. तेथे पोलिसांनी बॅरेकेटस लावून त्यांना अडविले. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मारला. यावेळी मंत्री पाटील यांचे स्वीय सहायक योगीराज सुर्वे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागण्यांवर ठाम राहिले. ‘एफआरपी’संबंधी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत तेथून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले. ४५ आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून रात्री उशिरा सोडून दिले. केंद्र शासनाने प्रती टन ऊस उत्पादकांना ७०० रुपये द्यावेत, सर्व साखर कारखान्यांत डिजिटल आॅनलाईन वजन काटे त्वरित बसवावे, काटामारी बंद करावी, साखर आयुक्तांना निलंबित करावे, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. (प्रतिनिधी)खासदार शेट्टी गप्प का?ऊसदरावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत टनाला केवळ २७०० रुपये दर मागितला. सरकारला महिन्याची मुदत दिली. पुढे त्यांनी काहीही केले नाही. ऊसदरासाठी खासदार शेट्टी, शरद जोशी, रघुनाथ पाटील कोणीही बोलायला तयार नाहीत. यामागचे गौडबंगाल काय? असा सवालही देशमुख यांनी केला.
सहकारमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: April 16, 2015 10:58 PM