मिलिंद देशपांडे
दत्तवाड: उन्हाने लाहीलाही होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात काल, सोमवारी सायंकाळी वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. यापावसामुळे उकाड्यापासून नागरिकांनी दिलासा मिळाला. तर, उन्हामुळे करपून जात असलेल्या पिकांनाही याचा फायदा झाला. विशेष म्हणजे शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील माजी सैनिक, शेतकरी दादा खोत यांनी पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये केक कापून आपला आनंद साजरा करून पावसाचे स्वागत केले.टाकळीवाडीमध्ये यंदा वळीव पावसाने हजेरीच लावली नव्हती. माळ रान भरपूर असल्यामुळे बोर, विहिरीला पाणी कमी आले होते. पिकांसाठी पाण्याचे नियोजन होत नव्हते. परिणामी पिके करपत होती. यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. चातक पक्षाप्रमाणे शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले होते.
अन् काल, सोमवारी जिल्ह्यात अखेर वळीव पावसाने हजेरी लावलीच. यामुळे टाकळीवाडीतील शेतकरी खुश झाला. शेतकरी दादा खोत या शेतकऱ्याने आपला आनंद चक्क शेतात केक कापून साजरा केला. आनंद काय असतो हेच यातून या शेतकऱ्यांकडून शिकावे लागेल.आला रे आला.. पाऊस आला, शेतकऱ्यांचा राजा पाऊस आला अशी गाणी गात, जय किसान..जय किसान, जय विज्ञान अशा घोषणा दिल्या. यावेळी माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे, पुंडलिक निर्मळे (शेतकरी), प्रणव कुंभार, आरोही पकाणे, राजनंदिनी निर्मळे, भोपाल बदामे उपस्थितीत होते.