(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : विधान परिषदेच्या तुकड्यासाठी आपली अस्मिता गहाण ठेवणाऱ्या राजू शेट्टींना शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या कायद्याबद्दलचा जाब विचारण्याचा अधिकार नाही. केवळ मोदींविरोधी तिरस्कार असल्याने हे सत्य स्वीकारण्याचे त्यांचे धाडस होत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
किसान आत्मनिर्भर रॅलीची चंदूर (ता. हातकणंगले) येथील सैनिक कट्ट्यावर गुरुवारी सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. दरेकर म्हणाले, चळवळीतील कार्यकर्ते म्हणून शेट्टींबद्दल आकर्षण होते. परंतु शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या निघत असताना त्यांनी विरोध केला. राज्यातील तीनचाकी सरकार हे दारूड्यांना पोसणारे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी दारूलाच पहिला परवानगी दिली तसेच शेतकऱ्यांना भडकावून सुरू केलेल्या आंदोलनात राज्य सरकारला यश मिळाले नाही. शेतकरी या कायद्याच्या बाजूने राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, संपूर्ण हिंदुस्थानात पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जात होते परंतु हे आता चक्र उलट बनले आहे. त्याला पुन्हा सरळ करून शेतीला उत्तम करण्यासाठीच मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणले आहेत. पंजाब, हरियाणा येथील परिस्थिती वेगळी आहे. देशातील ३३ टक्के बाजार समित्या तेथे आहेत. हजारो कोटींची त्याठिकाणी उलाढाल होते. त्यामुळे त्यातील दलालांची अडचण होणार होती. त्यासाठी आंदोलन सुरू केले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी, शेतकरी गरीब राहिला. त्याला दर मिळाला नाही, तरच त्यांची नेतेगिरी चालते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे नाही, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. दिल्लीतील आंदोलनात दलाल व राजकीय बगलबच्चे सहभागी झाले आहेत. राज्यात ठाकरे सरकार घरात बसून वल्गना करत आहेत. बाहेर पडून माहिती घ्या, अशी टीका केली.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, बाबा देसाई, अशोक स्वामी, अनिल डाळ्या, कुमार पाटील, अमृत भोसले, काशीनाथ पुजारी, विशाल पाटील, आदी उपस्थित होते. सभेच्या पार्श्वभूमीवर गावात कडक बंदोबस्त तैनात केला होता.
(फोटो ओळी)
२४१२२०२०-आयसीएच-०३
किसान आत्मनिर्भर रॅलीची चंदूर (ता. हातकणंगले) येथील सभेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, बाबा देसाई, अशोक स्वामी, अनिल डाळ्या, कुमार पाटील, अमृत भोसले, आदी उपस्थित होते. (छाया : उत्तम पाटील)