कोल्हापूर ,दि. २५ : मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. ऊसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
संपुर्ण देशात साखर एकाच दराने विक्री होते, गुजरात मधील साखर कारखाने १२.५० टक्के उताऱ्या ला ४४४१ रूपये प्रतिटन दर देत असतील तर महाराष्ट्रातील कारखान्यांना काय झाले. कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी आतापर्यंत २८०० ते ३ हजार रूपयांपर्यंत दर दिला आहे.
‘हुतात्मा’ कारखान्याने ३३५५ रूपये उच्चांकी दर दिाला मग त्यापेक्षा जास्त उतारा असणाऱ्या कोल्हापूरातील कारखान्यांना अडचण काय? याबाबत साखर सहसंचालक म्हणून आपण काय केले? अशी विचारणा युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी केली. मागील हंगामातील कमी दिलेला दर तातडीने द्यावा व या हंगामासाठी साडे तीन हजार रूपये पहिली उचल द्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.
पिकवलेला ऊस कोठे घालायचा हा आम्हाला घटनेने हक्क दिला आहे. पण राज्य सरकार ऊसबंदी करून शेतकऱ्याना दुहेरी अडचणीत आणत आहे. पोलीसांनी हस्तक्षेप केला तर पोलीस चौक्या उध्दवस्त केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. मागणीचे निवेदन प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना देण्यात आले. यावेळी महादेव कोरे, अजित पाटील, आदम मुजावर, मुन्ना सय्यद, हणमंतराव पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
वजन तपासणीसाठी पथकेसाखर कारखाने वजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लुट करत आहेत. त्यांच्यावर कारवाई साठी काय केले अशी विचारणा केल्यानंतर यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केल्याचे रावल यांनी सांगितले.कर्जमाफीचा तमाशाराज्य सरकारने ऊस दरापाठोपाठ आता कर्जमाफीचा तमाशा सुरू केला आहे. नेमके काय करत आहे हे त्यांनाच कळत नसल्याची टीका महादेव कोरे यांनी केली.