कोल्हापूर : गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिकात पाणी उभे राहिले आणि शेंगाना पाणी लागल्याने कोंब सुटण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यात जुलै, आॅगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या आडसाल लागणी केल्या जातात. विशेषता नदी बुडीत क्षेत्रात पुराचे पाणी येऊन गेल्यानंतर लागणीस गती येते. सप्टेंबर, आॅक्टोबर मध्ये जरी जोरदार पाऊस होत असला तरी तो एक सारखा आठ दिवस बसत नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे नदी काठावर प्रामुख्याने ऊसाची आडसाल लागणच केली जाते. यंदा मात्र शेतकºयांचा अंदाज चुकला असून गेले चार दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे.
धरणक्षेत्रातही धुवांदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याची फुग नद्यांना दिसत असून पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पाण्यामुळे ऊसाच्या लागणी अडचणीत आल्या आहेत. ऊसाची रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. नदी काठावरीलच लागणी अडचणीत आल्या असे नाहीतर इतर रानातीलही लागणीमध्ये पाणी तुबंले आहे.
भात पिक परिपक्व झाले आहे. लोबं भरल्याने अगोदरच भाताला वजन पेलणे अवघड झाले आहे, त्यात एक सारखा पाऊस सुरू असल्याने भात लगेच जमिनीवर आडवे होत आहे. लोंब पाण्यात भिजल्याने त्यांना कोंब येण्यास सुरूवात झाली आहे. सोयाबीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. सोयाबीनची पाने व शेंगा पिवळी धमक झाली आहेत. डोक्यावर पाऊस आणि सरीत पाणी असल्याने सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडू लागल्या आहेत.
ऊसपिकही आडवे
हा पाऊस ऊस पिकाच्या वाढीस उपयुक्त असला तरी मोठ्या ऊसाचे नुकसानही तेवढेच होत आहे. जोरदार वाहणारे वाºयामुळे ऊस जमिनीवर आडवे झाले आहेत. त्यामुळे या ऊसाचे वजन घटण्याची भिती व्यक्त केली जात आहे.