गतवर्षी कोरोना महामारीमुळे मोठे संकट ओढवले. शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले. छोटे, मोठे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, अशा काळात शेतकरी वर्ग आपली कामे सुरळीतपणे करीत होता. कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम्- सुफलाम् बनला आहे. नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. परिणामी, नुकसानीलादेखील सामोरे जावे लागले.
कोरोनानंतर पावसामुळेदेखील शेतीला मोठा फटका बसला. सप्टेंबर २०२० मध्येदेखील पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. परतीचा पाऊस नुकसानकारकच ठरला. एकामागून एक संकटे आली. मात्र, आज ना उद्या शेतीमालाला भाव मिळेल, या आशेपोटी शेतकरी उत्पादन घेत राहिला. मातीत पैसे टाकायचे आणि दराची वाट बघत बसायची, अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची बनली आहे. सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्याचाही फटका भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळातही शेतकरी आपले काम अविरतपणे पार पाडत आहेत. खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. बियाणे, खतांचे नियोजन याचा ताळमेळ शेतकऱ्यांकडून घातला जात आहे.
फोटो - २१०५२०२१-जेएवाय-०३, ०४
फोटो ओळ - ०३) शिरोळ येथे शेतामध्ये शेतकरी ऊस पिकाला पाणी देण्यात व्यस्त होता.
०४) शिरोळ येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीकामे सुरू आहेत. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)