आजरा : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गुणवत्ता व चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळावी, असे आवाहन तालुका आजरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुधाकर खोराटे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच सीलबंद वेस्टन, आतील लेबल असलेली बियाणे खरेदी करावीत. बियाणे खरेदीची पावती घ्यावी, पावतीवर पिकाचे वाण, नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे त्याचे नाव, बियाण्याची किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही अशी माहिती नमूद असलेली पावती घ्यावी, बियाणे खरेदी करताना वैद्य मुदतीची खात्री करून घ्यावी व वैद्य मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावेत.
पिशवीवर नमूद रकमेपेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नयेत. बियाणे खरेदीची पावती, बॅग व त्यावरील लेबल आणि त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे खरेदी करताना संबंधित विक्रेता संपूर्ण विवरणासहित बिल देत नसेल, मुदतबाह्य बियाणांची विक्री करीत असेल, छापील किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करीत असेल तर या संबंधीची तक्रार आजरा पंचायत समितीचा कृषी विभाग किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करावे, असे आवाहन कृषी अधिकारी सुधाकर खोराटे यांनी केले आहे.