आजरा : बाजारात एकदम काजूचा माल आला की दर घसरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काजू विक्रीत संयम ठेवावा. निश्चितपणे चालूवर्षी काजूला चांगला दर मिळेल, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेने केले आहे. वर्षापूर्वी काजूला प्रतिकिलो १६० रुपये दर घेतला होता. परंतु, गेल्यावर्षी कोरोनामुळे व्यापाऱ्यांनी अचानक ५० ते ६० रुपयांच्या आसपास काजूची खरेदी सुरू केली. परंतु, सर्वजण संघटित राहिल्यामुळे तो दर ११५ रुपयांपर्यंत मिळाला. चालूवर्षीही शेतकऱ्यांनी काजू विक्रीत संयम ठेवावा. आता काजू व्यापारी १७० रुपये प्रतिकिलोने काजू घेण्यास तयार आहेत. पण, आपल्याकडे काजू शिल्लक नाही. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे लगेच काजू विक्री न करता थोडा संयम ठेवल्यास निश्चितपणे चांगला दर मिळेल.
चालूवर्षी काजू दराचा लढा नियोजनबद्ध आणि संघटितपणे करावयाचा आहे. चालूवर्षीचा काजू दर ठरविण्यासाठी गरज पडल्यास काजू परिषदही घेतली जाणार आहे. या परिषदेतही शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेने केले आहे.