कोल्हापूर: शेतातील कामे सोडून काय भजन, किर्तन, मनोरंजन करायला येथे आलेलो नाही, दिवसभर उन्हात बसलो तरी अधिकाऱ्यांना दखल घ्यावी वाटत नाही. शेतकऱ्यांचा रोष समजून घ्या, त्यांना किड्या मुंग्या समजू नका, त्यांचे प्रश्न गांभिर्याने घ्या नाही तर शेतकऱ्यांचा हिसका काय असतो ते येथेच दाखवून देऊ असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी महावितरणला दिला.
दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसूली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, मंगळवार सकाळपासून ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. स्वत: राजू शेट्टी हे ठिय्या आंदोलन खुर्ची टाकून ठाण मांडून बसले होते.प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, माजी सभापती सावकर मादनाईक, राजेश पाटील, राजेंद्र गडड्ड्यानवर, सागर शंभूशेटये, वैभव कांबळे, सागर कोंडेकर यांनी दिवसभर आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या व्यथांची मांडणी केली.दिवसा वीज मागणे हा आमचा अधिकार आहे, हे सांगताना शेट्टी यांनी महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले. जलविद्यूत प्रकल्प चांगले असतानानाही ते बंद असल्याचे भासवून वीजेची टंचाई आहे म्हणून खासगी कंपन्याकडून वीज खरेदी करण्याचा घाट घातला होता, यावर आवाज उठवल्यावर लागलीच चार तासात ते प्रकल्प सुरु झाल्याचे महावितरणला जाहीर करावे लागले, ही आमच्या आंदोलनाची ताकद असल्याचे शेट्टींनी सांगितले.आताही दिवसा वीज देणे शक्य असतानाही महावितरण मुद्दाम रात्रीचा पुरवठा करते. रात्री अपरात्री पाणी पाजायला गेलेला पोर घरात येईपर्यंत आई बापाचा डोळा लागत नाही, वन्य प्राण्यांची भीती असतानाही जीव मुठीत घेऊन रात्री पाणी पाजायची वेळ येते, आमच्या पोरांच्या जीवाची काही किंमत या अधिकाऱ्यांना आहे की नाही असा सवालही शेट्टी यांनी केला.
पोलिसांचा मोठा फौजफाटास्वाभिमानीच्या आंदोलनात गनिमा कावा केला जात असल्याचा पुर्वानुभव असल्याने पोलीस यंत्रणा सकाळपासून अलर्ट होती. कार्यालयाकडे येणारा जाणारा मार्ग बॅरीकेट लावून आधीच पोलीसांनी बंद केला होता. याच्या आत, बाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनस्थळाला लागूनच पोलीस व्हॅन थांबवून ठेवण्यात आली होती.