कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करावी, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनातर्फे प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.पत्रकात म्हटले आहे, पाटबंधारे मंडळ उत्तर विभागातर्फे दूधगंगा धरणाची गळती काढण्याच्या कामास यावर्षी सुरूवात करणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही हंगामांसाठी पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करण्यात यावी. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता २५.४० टीएमसी आहे. गेल्यावर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीमुळे २०.५४ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. या पावसाळ्यात पाऊस कमी झाला आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा सिंचनासाठी अपुरा झाला. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणीसाठा २४.२२ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठा २२.८२ इतका करण्यात आला आहे. सध्या आवर्तन सुरू आहेत. सध्याचा एकूण पाणीसाठा २३.२५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २१.८५ टीएमसी पाणीसाठा आहे.दरम्यान, दूधगंगा धरणाच्या गळती काढण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, तसेच मागील वर्षापेक्षा जास्त उसाची लागण करू नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.
शेतकऱ्यांमध्ये संतापदूधगंगा कालव्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. चार पैसे मिळवून देणारे पीक असल्याने बहुतांशी शेतकरी उसाची लागवड करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाने जास्त उसाची लागवड करू नका, असा अजब फतवा काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना धरणातील पाणी कमी करूनच गळती काढण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची काय गरज आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आगामी काळात पाटबंधारे प्रशासन आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.