कोल्हापूर : गेली साठ वर्षे पिठाची गिरणी चालविणाऱ्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा गुणवत्तेच्या बळावर आज शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू झाला. माझ्या आयुष्यात यापेक्षा मोठा आनंद कोणताच असू शकत नाही, अशा भावना नूतन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे वडील तुकाराम सीताराम शिर्के (वय ८२, रा. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.
आज या आनंदाच्या क्षणी कुलगुरूंच्या आई जिवंत असत्या तर त्या आनंदाने हरखून गेल्या असत्या. तेवढेच मनाला शल्य असल्याची भावना वडिलांनी व्यक्त केली. निवडीची बातमी समजताच त्यांचे घर आनंदात न्हाऊन गेले.शिर्के हे गावातील पारंपरिक कुंभार समाजातील सामान्य कुटुंब. त्यांची गावांत कुटुंबाची अडीच-तीन एकर बागायती जमीन; परंतु त्यांचा आजोबापासून गुऱ्हाळांना लागणाऱ्या काहिली व अन्य साहित्य भाड्याने व विकत देण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या जोडीलाच साठ वर्षांपासूनच त्यांची पिठाची गिरणी, तेलघाणा, चटणी-कांडप असे एकत्रित युनिट आहे.
त्यांचे वडील या वयातही शेती व गिरणीत लक्ष घालतात. उद्यमशीलता त्यांच्यात वारशाने आली आहे. वडील जुनी अकरावीपर्यंत शिकलेले व आई शारदा शिर्के सातवीपर्यंत शिकलेल्या. आईंचे २० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. नूतन कुलगुरू शिर्के यांच्या पत्नी या कऱ्हाडजवळच्या कोळेवाडी गावच्या. त्या विवेकानंद कॉलेजमध्ये रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.डी. टी. शिर्के हे अभ्यासात सुरुवातीपासूनच पुढे राहिले. शाळेपासून विद्यापीठापर्यंत त्यांनी कधी पहिला क्रमांक सोडलेला नाही. ज्या विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले, त्यांना नोकरी केली, त्याच विद्यापीठाचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांनी स्वत:चे भवितव्य स्वत: घडविले. त्यांनी संख्याशास्त्रातूनच एम. एस्सी. केले तेव्हा आम्हांला केवढा अभिमान वाटला होता, असेही वडिलांनी सांगितले.
शिर्के यांना सुरुवातीपासूनच अपार कष्ट करण्याची सवय आहे, असे त्यांचे भाऊ अरविंद यांनी सांगितले. अरविंद शिर्के यांचा अर्थमूव्हिंग मशिनरीसाठी लागणारी सील उत्पादन विक्रीचा व्यवसाय आहे. धाकटे भाऊ मधुकर हे वाठारला सील तयार करण्याचे युनिट सांभाळतात.वडणगेत बालपणनूतन कुलगुरू डॉ. शिर्के यांचे आजोळ करवीर तालुक्यातील वडणगे. गोविंद पांडुरंग कुंभार हे त्यांचे मामा. त्यामुळे त्यांचे लहानपण वडणगे येथेही गेले. वडणगेशी असलेला हा जुना ऋणानुबंध डॉ. शिर्के यांनी अजूनही जपला आहे.