कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघातील ३७ लाख अपहाराच्या वसुलीसाठी संचालक मंडळाने निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. संबंधितांवर कारवाई करून वसुलीचे काय? हा प्रश्न असून, त्यामुळेच अपहारातील कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त रक्कम वसुलीचे प्रयत्न संचालकांनी सुरू केले आहेत.संघाच्या शिरोळ शाखेत ३७ लाखांचा अपहार झाला आहे. खताची परस्पर विक्री करून पैसे हडप केले असून, चौकशीत शाखा व्यवस्थापकासह दोन निरीक्षकांना दोषी धरले आहे. संघाने लेखापरीक्षकांची नेमणूक करून अपहाराची नेमकी रक्कम निश्चित केली आहे.
अपहाराबाबत संबधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी संचालक मंडळावर दबाव होता; पण गुन्हे दाखल केले तर अपहारातील पैशांचे काय? असा प्रश्न असल्याने संचालकांनी त्यांच्याकडून पैसे वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
संबंधित कर्मचाऱ्यांसोबत दोन-तीन बैठका झाल्या असून, ३७ लाखांपैकी कोणी किती पैसे भरायचे हेही निश्चित झाले आहे. येत्या दोन दिवसांत अपहारातील संपूर्ण रक्कम भरण्याची तयारी संबंधित कर्मचाऱ्यांनी दर्शविली आहे. उद्या, बुधवारार्यंत पैसे भरण्याच्या सूचना संचालकांनी दिल्या आहेत. या वेळेत पैसे भरले नाही, तर गुन्हे दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
तीस वर्षांपूर्वीची वसुली अडकलीसंघात १९९१ मध्ये अपहार झाला होता. त्यावेळी संबंधितांवर गुन्हे दाखल केले होते. सध्या हा वाद न्यायालयात प्रलंबित असून, त्याची वसुली होऊ शकलेली नाही. अपहाराची रक्कमही वसूल झाली नाही आणि त्यासाठी खर्च मात्र संघाला करावा लागतो. हा अनुभव पाठीशी असल्याने संचालकांनी वसुलीवर जोर दिल्याचे समजते.