कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघास २०१६-१७ या आर्थिक वर्षात १६१ कोटींची उलाढाल झाली असून तब्बल १ कोटी १ लाख ४८ हजार नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षी तोट्यात असणाऱ्या शाखा नफ्यात आल्या असून, आगामी काळात किमान ४0 शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने शेतकरी संघ अडचणीत आला होता; पण संचालक मंडळाने रुकडी येथील खत कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला. त्यामध्ये कंत्राटी कामगार घेऊन खर्चात काटकसर केली. खत कंपन्यांची बिले वेळेत दिल्याने त्यांच्याकडूनही सुमारे आठ ते नऊ लाखांची सूट मिळाली. संघाने बैल छाप दाणेदार व हातमिश्र खत १८:८:१० चे उत्पादन सुरू केले. गुणवत्तेच्या बळावर या खताने शेतकऱ्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण तयार केले. त्यामुळे वर्षभरात आठ हजार टन स्वत:चे खत उत्पादन करू शकलो. पेट्रोल व डिझेल पंपांच्या माध्यमातूनही संघाला चांगले उत्पन्न मिळाले आहे. धान्य, मिरची पूड, मसाले, कडधान्य विभागही सक्षमतेने सुरू आहेत. चार नवीन शाखा सुरू करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सध्या ६० शाखा कार्यरत असून, आगामी काळात हा आकडा शंभरापर्यंत नेण्याचा आमचा मानस असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले. संघाच्या उत्पन्नवाढीत संचालकांबरोबर कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ४५ लाख रुपये अदा केले. संघाच्या अमृतमहोत्सवानिमित्त कर्मचाऱ्यांना वीस दिवसांचा पगार बक्षीस म्हणून दिला आहे. त्याचबरोबर सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप केला आहे. टिंबर मार्केट येथील जागेवर पेट्रोलपंप सुरू केला जाणार आहे. जुने २९ हजार सभासद होते; पण पोटनियम दुरुस्तीनुसार क्रियाशील सभासद तेरा हजारच राहिले आहेत. नवीन सभासदांमुळे १ कोटी २ लाखांचे भागभांडवल झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, आण्णासाहेब चौगुले, जी. डी. पाटील, मारुती पाटील, शशिकांत पाटील, विजयकुमार चौगले, विनोद पाटील, अमरसिंह माने, व्यंकाप्पा भोसले, सुमित्रादेवी शिंदे, व्यवस्थापक आप्पासो निर्मळे उपस्थित होते. सांगली, कऱ्हाडसह कर्नाटकात शाखासंघाचा विस्तार वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी नजीकच्या काळात सांगली, कऱ्हाड, कोगनोळी, सदलगा येथेही शाखा सुरू करून व्यवसाय वृद्धिंगत केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवला होता; पण हा भत्ता पूर्ववत करण्याबाबत विचार सुरू असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार किमान एक हजार ते बाराशे रुपयांनी वाढणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शेतकरी संघाचा ‘बैल’ शर्यतीत
By admin | Published: April 19, 2017 12:53 AM