भाग 3
प्रकाश पाटील
कोपार्डे : वाघजाई डोंगरावरील हक्काची जमीन दलालाच्या माध्यमातून धनदांडगे आणि लोकप्रतिनिधी लाटत असल्याने आता त्याविरोधात येथील शेतकऱ्यांनीची एकीची वज्रमूठ आवळत त्याविरोधात लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. वाघजाई संघर्ष समितीच्या माध्यमातून करवीर व पन्हाळा तालुक्यातील १२ गावांतील शेतकरी या लढ्यात सहभागी होणार आहेत. वाघजाई डोंगरावरील जमीन हडपण्याचे प्रकार थांबवा अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. करवीर व पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर १८०० एकरांवर हा वाघजाई डोंगर पसरला आहे. भरपूर वनसंपदा नसली, तरी निसर्गसंपन्न परिसर असल्याने धनदांडग्यांची २०१८ पासून या डोंगरावर वक्रदृष्टी पडली आहे. १९७३ पर्यंत करवीर व पन्हाळा तालुक्यातील १२ गावांतील लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी सैनिक, धरणग्रस्तांना देण्यासाठी सरकारने ताब्यात घेतल्या. ५१० लाभार्थ्यांना ही जमीन देण्यात येणार होती. यासाठी महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात यादी तयार केली. डोंंगरावरील ७१६ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले. यातील केवळ ८४ लोकांनी १८८ हेक्टर ३१ आर क्षेत्र ताब्यात घेतले.
उर्वरित ५२८ हेक्टरवरील १३८ हेक्टर ३४ आर क्षेत्र २३२ लाभार्थ्यांना वाटप केले. पण त्याचा कब्जा त्यांनी घेतला नाही, तर १९४ लोकांना वाटप करण्यात आलेल्या ३६२ हेक्टर १२ आर क्षेत्रावर आजही लाभार्थींंची वहिवाट नाही.
याचाच फायदा उठवत दलालांनी वाघजाई डोंगरावरील जमिनी खरेदी-विक्रीचे रॅकेट तयार केले. लाभार्थी गाठून त्याला काही मोबदला देऊन खूष करत वटमुखत्यारपत्र तयार करायचे व ती धनदांडग्यांना विकण्याचा धंदा त्यांनी सुरू ठेवला आहे. यामुळे स्थानिक व खरेदीदार यांच्यात वादावादीचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता १२ गावांतील शेतकऱ्यांनीच एकीची हाक देत डोंगर वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोट : १९७२ पर्यंत या जमिनी आमच्या पूर्वजांच्या नावावर आहेत. यानंतर कुबलायत व वहिवाट आजही आमच्याकडे आहे. पण, गेल्या पाच वर्षांत दलालांनी कायद्याच्या पळवाटा शोधत या जमिनी धनदांडग्यांना विकून पैसा मिळवायला सुरुवात केली आहे. यात राजकीय व उचपदस्थ अधिकारी आहेत.
भगवान गणपती पाटील (म्हाळुंगे, ता. पन्हाळा).