गणपती कोळी
कुरुंदवाड : वीज महावितरण कंपनीने कृषी वीज सवलतीतून शेतकरी, ग्रामपंचायतीला भरघोस सवलत दिली आहे. या योजनेमुळे महावितरणबरोबरच शेतकरीही वीज बिल थकबाकीतून मुक्त होणार आहेत. शिवाय ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पनाचे नवीन स्त्रोत निर्माण झाले असून, या उत्पन्नातून गावागावातील वीज वितरणासंदर्भात रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. त्यासाठी शेतकरी आणि ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेण्याची गरज आहे.
महापूर, कोरोना यासह विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी शेती उत्पादनात नुकसानीत आल्याने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज बिले अनेक वर्षांपासून थकीत आहेत. येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत अठरा गावे येत असून या गावांतून सुमारे ३४ कोटी रुपये कृषी वीज बिले थकीत आहेत.
राज्य शासनाने थकीत वीज बिलात पन्नास टक्क्यांची सूट दिली आहे. ही योजना यशस्वी व्हावी यासाठी महावितरणने ग्रामपंचायतीला गावातील थकबाकी वसुलीवर ३३ टक्के तर ग्रामपंचायतीने वसूल करून दिल्यास ३० टक्के अधिक असे एकूण ६३ टक्के रक्कम ग्रामपंचायतीला विकास कामासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणार आहे. यासाठी सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या योजनेमुळे महावितरण आणि शेतकरी कृषी वीज बिल थकबाकीतून मुक्त होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी आहे.
चौकट -
ग्रा.पं.कडून नियोजन गरजेचे वीज बिल वसुलीतून ३० टक्के जादा रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार आहे. ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना पाच ते दहा टक्के जादा सवलत दिल्यास शेतकरी आणि ग्रामपंचायत दोघांनाही आर्थिक लाभ होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन करणे आवश्यक आहे.
कोट -
या विभागातील गावांमध्ये एकूण ३४ कोटी रुपये थकबाकी असून माफी वगळता अठरा कोटी रुपयांची वसुली आहे. कृषी थकीत वीज बिलात प्रथमच अशी मोठी सवलत दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा.
- सिकंदर मुल्ला, सहाययक अभियंता