लोकमत न्यूज नेटवर्क ,
गारगोटी: मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, तसेच या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव फुटून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पालकमंत्री बोलत होते. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणाचा पाढाच वाचला. धरणाच्या सुरुवातीपासून गळती असल्याचे वेळोवेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनीदेखील ही बाब लक्षात आणूनदेखील गळती काढण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही. या धरणावर असलेल्या सुरक्षा रक्षकाची बदली अन्यत्र केली. जर रक्षक असता तर धरण फुटण्याअगोदर पाणी सोडता आले असते, असे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले. यावर पालकमंत्री म्हणाले, या भागातील शेतकरी व गावकऱ्यांची पाण्याची सोय जलद होण्यासाठी या प्रकल्पाचे बांधकाम तत्काळ करण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करण्यात येईल. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना तातडीने मदत मिळवून देणे तसेच मयत जनावरे व शेतीची नुकसान भरपाई देण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. येत्या आठ दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत, पंचनाम्यांबाबत कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. आमदार आबिटकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सद्याचे पीककर्ज माफ करून आगामी काळात कर्ज द्यावे, अशी मागणी केली. जि.प. सदस्य जीवन पाटील,सत्यजित जाधव,बिद्रीचे संचालक मधुकर देसाई,माजी सभापती बाबा नांदेकर,बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
..................
जमीन सरळ करून द्या
तलाव फुटीने झालेले नुकसान, गाळाने भरून गेलेल्या विहिरी, मोटरपंप, इंजिन, पाण्याच्या पाईप लाईन आणि नामशेष झालेली शेती, ओढा पात्र यांचा सर्व्हे करून ओढा पात्र व्यवस्थित झाल्यावर जमिनी बसवून मिळाव्यात, अशी मागणी सत्यजित जाधव यांनी केली.
०४मेघोली
मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव फुटून झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.