प्रवीण देसाई
कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्चित झाली आहे. या ठिकाणी यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी रोपे लावली जाणार आहेत.या योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरुष नसलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, वननिवासी लाभार्थी यांना प्राधान्य दिल्यानंतर कृषी कर्जमाफी व कर्जसाहाय्य योजनेतील लहान व सीमांतभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनींवरही हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये इच्छुक लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच पाच एकरांपेक्षा कमी क्षेत्र अपेक्षित आले.इच्छुकांनी या योजनेसाठी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करायचे आहेत. त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायतीने आपल्या शिफारशींसह सामाजिक वनीकरणाच्या संबंधित शाखेत हस्तांतरित करायचा आहे. यानंतर वनपाल प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसह प्रस्ताव सामाजिक वनीकरणाकडे सादर करतील.
जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव एकत्रित करून ते मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. त्यांच्या मंजुरीनंतर विभागीय सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.या योजनेंतर्गत १ जून ते १३ डिसेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावरील हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
असे असले तरी सामाजिक वनीकरण विभागाने राज्याच्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात या योजनेचा समाविष्ट केला आहे. त्यामुळे १ ते ३१ जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर रोपे लावली जाणार आहे. या योजनेसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी याबाबत माहिती घेत आहेत.
पन्हाळा, मलकापुरातील ३१२ एकर जमीन निश्चितशेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड या योजनेंतर्गत पन्हाळा व मलकापूर येथील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पन्हाळा येथील ६२ एकर व मलकापूर येथील २५० एकर जमीन यासाठी निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी रोपे लावण्याचे काम १ जुलैच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी होणार आहे.
‘रोहयो’अंतर्गत जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून याबाबत विचारणा होत आहे. पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर क्षेत्र यासाठी निश्चित झाले आहे. यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात या ठिकाणी रोपे लावली जातील.-दीपक खाडे,विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, कोल्हापूर.