संतोष मिठारी
कोल्हापूर : विविध स्वयंसेवी संस्था, संघटना आणि जिल्हा प्रशासनातर्फे ‘सेंट्रल किचन’द्वारे शहर आणि ग्रामीण परिसरातील पूरग्रस्तांना आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत १६ हजार ९९ पूरग्रस्तांना या वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. शहरातील पूरग्रस्तांना कीट वितरित करण्याची कार्यवाही रविवारी सुरू झाली.श्री सिद्धगिरी मठ, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, केटरिंग असोसिएशन, सी. ए. असोसिएशन, आदी स्वयंसेवी संस्था, संघटना आणि जिल्हा प्रशासनातर्फे सेंट्रल किचन सुरू करण्यात आले आहे. अन्नधान्य, ब्लँकेट आणि विविध जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर मदत जिल्ह्यातील स्थानिक संस्था, संघटनांसह महाराष्ट्र, केरळ, आदी राज्यांतून कोल्हापूरला येत आहे. ही मदत सेंट्रल किचनमध्ये संकलित आणि त्याचे वर्गीकरण केले जात आहे.
पाच ते सहा जणांच्या कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून ते वाटप करण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. या किचनमध्ये दिवसरात्र विविध बॅचेसमध्ये सुमारे ७00 स्वयंसेवक कार्यरत आहेत.
चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा तालुकापातळीवर दोन हजार ४७७ पूरग्रस्तांना कीट देण्यात आले आहे. उर्वरित १३ हजार ६२२ पूरग्रस्तांना सेंट्रल किचनद्वारे मदत करण्यात आली आहे. रविवारी दिवसभर कीट तयार करण्याचे काम वेगाने सुरू होते. मुंबईतील मल्याळी ग्रुपने जीवनावश्यक वस्तूंचे सुमारे साडेचार हजार कीट मदत स्वरूपात या किचनकडे सुपूर्द केले.
जीवनावश्यक वस्तूंचे कीट असेगव्हाचे पीठ, तांदूळ प्रत्येकी पाच किलो, रवा दोन किलो, तूरडाळ, मूगडाळ, मटकी, साखर, बेसनपीठ प्रत्येकी दोन किलो, गोडेतेल दोन किलो, मीठ अर्धा किलो, हळद १00 ग्रॅम, मसाले २00 ग्रॅम, चहापत्ती २५0 ग्रॅम, टूथब्रश तीन, टूथपेस्ट, मेणबत्ती, ब्लँकेट, चटई, माचिस बॉक्स, साबण, कपड्याचा साबण, लालतिखट, निलगिरी तेल, कापूर, टॉवेल, खोबरेल तेल, भांडी (पातेले, ताट, वाट्या, पेले), डास प्रतिबंधक कॉईल अथवा मशीन, खराटा, केरसुणी, बादली, मग यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या कीटमध्ये समावेश आहे.
या सेंट्रल किचनच्या माध्यमातून उज्ज्वल नागेशकर यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. रविवारपर्यंत ग्रामीण भागातील सुमारे १३ हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आता शहरातील विविध प्रभागांतील पूरग्रस्तांना या वस्तूंचे कीट वाटप सुरू केले आहे. अजून किमान आठवडाभर या किचनचे काम सुरू राहील.- आनंद माने, स्वयंसेवक, सेंट्रल किचन