संतोष मिठारी ।कोल्हापूर : ‘फेसाटी’तून वंचित जगाच्या वेदना मी मांडल्या आहेत. ही केवळ कादंबरीच नव्हे, तर माझ्या संघर्षाची कथा आहे. या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाल्याने माझी लिहिण्याची जबाबदारी वाढल्याची नम्र जाणीव मला आहे, अशी प्रतिक्रिया लेखक नवनाथ सोपान गोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लेखक गोरे म्हणाले, निगडी बुद्रुक (ता. जत, जि. सांगली) हे माझे गाव. विविध स्वरूपांतील अभावग्रस्त पार्श्वभूमीवर आणि प्रतिकूल परिस्थितीतून एम. ए. बी. एड. (मराठी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेताना शिवाजी विद्यापीठातून मला मोठा आधार मिळाला. सध्या मी शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागामधील प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांच्या बृहत् संशोधन प्रकल्पाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहे. पशुपालक समाजातील माझ्यासारख्या अनेक तरूणांना शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. या संघर्षातून प्रेरणा घेऊन मी ‘फेसाटी’ कादंबरी लिहिली. त्यातून वंचित जगाच्या वेदना मांडल्या आहेत. ‘सुंभरान’ या पारंपरिक आख्यानातून हे कथन केले. जत तालुक्याची बोलीभाषा अत्यंत समर्थपणे वापरली. पशुपालक समाजाचा वर्तमान भोवताल केंद्र करून हे वेगळ्या पातळीवरचे जीवन चितारले आहे.
ही कादंबरी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रसिद्ध झाली. या कादंबरीला विविध नऊ पुरस्कार मिळाले आहेत. ‘फेसाटी’द्वारे मी केलेल्या लेखनाची दखल थेट साहित्य अकादमीने घेतल्याने या पुरस्काराचे महत्त्व शब्दातीत आहे. हा पुरस्कार माझ्या भावी लेखन वाटचालीस प्रेरणादायी आहे. माझ्या लेखनप्रवासात मला प्रा. डॉ. राजन गवस, रणधीर शिंदे, नंदकुमार मोरे, दिनकर कुटे, दत्ता घोलप यांचे मार्गदर्शन लाभले.शिवाजी विद्यापीठातर्फे सत्कारदरम्यान, युवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लेखक गोरे यांचा शिवाजी विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ग्रंथभेट देऊन सत्कार केला. डॉ. शिर्के म्हणाले, लेखक गोरे यांना जाहीर झालेला हा पुरस्कार विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. त्यांनी साहित्यसेवा जोमाने सुरू ठेवावी. या कार्यक्रमास प्रा. डॉ. भारती पाटील, ए. एम. गुरव, प्रकाश राऊत, आर. के. कामत, रणधीर शिंदे, दत्ता घोलप, आदी उपस्थित होते.
साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारासाठी निगडी बुद्रुक (ता. जत) येथील लेखक नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीची निवड झाली. त्याबद्दल कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ग्रंथभेट देऊन लेखक गोरे यांचा सत्कार केला. यावेळी शेजारी प्रा. डॉ. ए. एम. गुरव, रणधीर शिंदे, पी. डी. राऊत, भारती पाटील, दत्ता घोलप, आदी उपस्थित होते.ग्रामीण परिसरातील सर्व तºहेचा अभावग्रस्त कुटुंबातील जीवघेण्या संघर्षाची, धडपडीची कहाणी या कादंबरीतून लेखक गोरे यांनी मांडली आहे. त्यांना साहित्य अकादमीचा जाहीर झालेला पुरस्कार हा ग्रामीण परिसरातील लिहिणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी आहे. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठसाहित्य अकादमीने ‘फेसाटी’ कादंबरीची दखल घेतल्याने आनंद झाला. या निमित्ताने खेड्यापाड्याचे, दुष्काळी भागाचे व शेतकरी वर्गाचे जीवन साहित्यातून मांडता आले. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याने आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.- नवनाथ गोरे