नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना सानुग्रह अनुदान तसेच नुकसान भरपाई लवकर मिळण्याबाबत ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी मंडल अधिकारी बबन पाटील, तलाठी शिवपाल चौगुले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संबंधित वरिष्ठांशी चर्चा करून चार दिवसांच्या आत सानुग्रह अनुदान देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी अमोल विभुते म्हणाले, श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील अनेकांना अद्याप सानुग्रह अनुदान, धान्य तसेच दुकान व शेतीचे पंचनामे करूनदेखील नुकसान भरपाई मिळाली नाही. याबाबत प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली असलीतरी भरपाई मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी मंडल अधिकारी पाटील व तलाठी चौगुले यांनी १७७ कुटुंबांना धान्य देण्याची व्यवस्था सोमवारपासून करण्यात येईल. तसेच ज्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही, त्यांची रक्कम गुरुवारपर्यंत खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, तानाजी निकम, अनघा पुजारी, पूनम जाधव, मंगल खोत, मुकुंद सावकार, विनोद पुजारी, अविनाश निकम, सुरेश गवंडी, गणेश पाडगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १८०९२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उपोषणस्थळी आंदोलनकर्त्यांना तलाठी शिवपाल चौगुले यांनी लेखी आश्वासन दिले.