कोल्हापूर : रुईकर कॉलनीत पकडलेला बिबट्या पाळीव होता. तो कुणी पाळला त्याचा शोध घेऊन त्याला अटक करा. बिबट्याच्या मृत्यू प्रकरणातील कर्मचारी, अधिकारी यांना निलंबित करावे, आदी मागण्या १४ जानेवारीपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनेका गांधीप्रणीत ‘पीपल्स फॉर अॅनिमल्स’चे विजय जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, १ जानेवरी रोजी रुईकर कॉलनीत आलेला बिबट्या पकडताना वन आणि पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले. पकडल्यानंतर बिबट्याची बरगडी मोडली होती. त्यावर उपचार न करताच ते त्याला जंगलात सोडण्यास घेऊन गेले. घेऊन जातानाही त्याचे हाल केले आहे. प्लास्टिक पिशवीने तोंड बांधून ठेवल्यामुळे त्याचा श्वास गुदमरला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झालाआहे. बिबट्याच्या शवविच्छेदनाचे सर्व पुरावे मिळावेत. वन्य प्राणी पकडण्यासाठी लागणारे प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी, इंजेक्शन प्रत्येक जिल्ह्णाच्या ठिकाणी उपलब्ध असावे. वन विभागाला पकडताना जखमी झालेल्या युवकावर झालेला उपचारांचा खर्च वन खात्याने द्यावा. या मागण्या पूर्ण कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
बिबट्या मृत्यूप्रकरणी उपोषणाचा इशारा
By admin | Published: January 08, 2015 12:12 AM