कवठेमहांकाळ (जि. सांगली) : पिंपळवाडी येथील माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर खोत याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कवठेमहांकाळ येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी ९.३० वाजता घडली. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे ग्रामपंचायत सदस्याच्या खुनापाठोपाठ हा हल्ला झाल्याने तालुका हादरला आहे.
अमर खोत हा कवठेमहांकाळ शहरातील थबडेवाडी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बसला होता. यावेळी अज्ञात दोघे दुचाकीवरून तेथे आले. काही समजायच्या आतच अमर खोतवर हल्लेखोरांनी कुकरीने वार केला. यात त्याच्या डोक्यात, छातीवर आणि पोटावर वार झाले. हॉटेल मालक विजय माने आणि बघ्यांनी मारेकऱ्यांना हुसकावून लावले. यावेळी विजय माने हेही जखमी झाले. अमर खोत यास तातडीने उपचारासाठी सांगलीला हलवले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
-----------------------------------------------------------
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे १८६ रुग्ण
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने गेल्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी चोवीस तासांत तब्बल १८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर होऊ लागल्याने जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा जाणवू लागलेली आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावरचा ताण वाढू लागलेला आहे. शुक्रवारी जिल्ह्यामध्ये १ हजार ३९३ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८६ जण बाधित आढळून आले आहेत.
आयसीयू बेड मिळेनात
जे रुग्ण कोरोना झाल्याने अत्यवस्थ झाले आहेत, त्यांच्यावर साताऱ्यातील कोविड जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. बाधितांची संख्या वाढून या हॉस्पिटलमधील बेडदेखील कमी पडू लागलेले आहेत. आयसीयूमध्ये बेड मिळावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, पत्रकार यांच्याशी संपर्क साधून लोक प्रशासनापर्यंत आपली व्यथा मांडत आहेत.