कोल्हापूर : न्यायाधीश हा पहिला वकील असतो. त्यामुळे वकिलांच्यात चांगले संबंध निर्माण केले. कोल्हापुरात न्यायदानाची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असे मत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. खंबायते यांनी व्यक्त केले. ते ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा शुक्रवारी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गेली अनेक वर्षे जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायदानाचे काम करणारे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश खंबायते हे सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी न्यायाधीश खंबायते म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करणार आहे. यापुढे बार असोसिएशन, खंडपीठ कृती समिती यांना आपले सहकार्य मिळेल. त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न राहील. कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील उपस्थित होते.
कोल्हापुरात न्यायदानाची संधी मिळाली हे भाग्य
By admin | Published: December 24, 2016 1:02 AM