संकेश्वर : कर्त्या मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने वयोवृद्ध पित्याचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी कर्त्या मुलाच्या आणि पित्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
संकेश्वर शहरातील सुभाष रोड परिसरात राहणारे व चिरमुरे व्यापारी राजेंद्र पुंडलिक काळेकर (वय ५७) यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने बुधवारी (दि. ९) खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, मुंबई येथे वास्तव्यास असलेले त्यांचे वडील पुंडलिक गंगाराम काळेकर (वय ८५) यांनाही मुलाच्या मृत्यूची माहिती समजली. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईतच निधन झाले. गुरुवारी पिता-पुत्रावर संकेश्वर येथे अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन, आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आहे. अथणी सरकारी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन काळेकर यांचे पुंडलिक काळेकर हे वडील; तर राजेंद्र हे त्यांचे धाकटे बंधू होत.
पाचवी पिढी व्यवसायात
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी हे काळेकर कुटुंबीयांचे मूळ गाव. १२५ वर्षांपूर्वी या घराण्यातील मारुती गोपाळ काळेकर हे चिरमुरे व्यवसायानिमित्त संकेश्वरमध्ये आले. संकेश्वरमध्येच त्यांनी चिरमुरे व्यवसायाचा श्री गणेशा केला आणि स्थायिक झाले. आज त्यांची पाचवी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे.
-
* पुंडलिक काळेकर : १०१२२०२०-गड-०१
* राजेंद्र काळेकर : १०१२२०२०-गड-०२