कोल्हापूर : रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपता घेऊन सख्ख्या भावासोबत दुचाकीवरून माहेरून सासरी निघालेली महिला अपघातात गंभीर जखमी झाल्या; पण या अपघातास रस्त्यावरील खड्डे जबाबदार असतानाही भरधाव वेगाने दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भावावरच पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ ते खाटांगळे रस्त्यावर सांगरूळ गावाजवळ हा अपघात रविवारी (दि. २२) रात्री घडला. त्याची नोंद मंगळवारी दुपारी करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करवीर तालुक्यातील कारंडेवाडी सासर असणारी विवाहिता भावावरील पोटी रक्षाबंधनाच्या सणासाठी आकुर्डे (ता. पन्हाळा) येथे रविवारी आल्या होत्या. दिवसभर भाऊ-बहिणीचे ऋणानुप्रेमबंध वाढविणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. रात्री जेवण आटोपते घेऊन भाऊ बहिणीला आपल्या दुचाकीवर घेऊन तिच्या माहेरी पोहोचविण्यासाठी निघाला. सांगरूळ ते खाटांगळे रस्त्यावर सांगरूळ गावाजवळ भरधाव दुचाकीचा धक्का लागल्याने त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या बहीण गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भरधाव वेगाने, हयगयीने दुचाकी चालवून रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात पोलिसांनी चक्क दुचाकीचालक भावावरच गुन्हा दाखल केला आहे.