कोल्हापूर : कोल्हापूरकरांना ताजा पाव खायची सवय आहे. पोटॅशियम ब्रोमेट हा पदार्थ पँकिंगच्या पावामध्ये मुख्यत: वापरला जातो. त्यामुळे या पदार्थामुळे कॅन्सर होतो अशी जोरदार चर्चा सुरु असली तरी स्थानिक बाजारपेठेतील पावाच्या विक्रीवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे बेकरी उत्पादकांनी सांगितले.गेले काही दिवस पाव बनवीत असताना त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट या आरोग्यास घातक असलेल्या रासायनिक पदार्थाचा वापर केला जात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांना कर्करोगासारख्या आजारालाही सामोरे जावे लागत असून, तसे पाहणी अहवालही सरकारला सादर झाले आहेत.कोल्हापुरातील जवळजवळ ३५० हून अधिक बेकरी उत्पादक पाव अथवा तत्सम पदार्थ बनविताना या पावडरचा वापर करीत नाहीत. किंबहुना ही पावडर कसली आहे, याची साधी माहितीही त्यांना नाही. आपल्याकडील पाव किमान तीन दिवस टिकतो. कोल्हापुरात तर ताज्या पावालाच मागणी अधिक असते. मोठ्या शहरातील काही पाव उत्पादक कंपन्या आपले उत्पादन जास्त काळ पॅकिंगमध्ये टिकावे, याकरिता त्यामध्ये असल्या रासायनिक पदार्थांचा वापर करतात. त्यामुळे हा पाव पांढराशुभ्र व मऊ आणि जास्त दिवस टिकतो. आपल्याकडे किमान ४५ मिनिटे पाव भाजला जातो. कमी वेळेत भाजलेला पाव वजनाला जास्त आणि कच्चा राहतो. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यात चांगल्या भाजलेल्या कडक पावालाच ग्राहकांकडून मागणी अधिक आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूरचा साधा पाव राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे. यामध्ये मैदा, मीठ, यीस्ट यांचाच वापर केला जातो. याशिवाय मिल्क पावासाठी साखर, दूध, यीस्ट, मैदा यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे कोल्हापुरात पॅकिंगचा कंपनी पाव बहुतांश मंडळी घेत नाहीत. या ग्राहकांना ताजा पाव लागतो. त्यामुळे रोजच्या रोज उत्पादन आणि विक्री होऊन तयार माल खपतोही. त्यामुळे रासायनिक पदार्थ वापरण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्ह्यात दररोज दीडशे ते दोनशे टन पावाचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचते.- एम. आर. शेख, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स संस्था
कोल्हापूरला आवड ताज्या पावाची
By admin | Published: May 26, 2016 11:43 PM