एकनाथ पाटील-- कोल्हापूर कमी श्रमांत जास्त पैसे मिळविण्याची लागलेली चटक, तत्काळ जामीन मिळत असल्याने कायद्याचा धाक नाही, वरिष्ठांचे दुर्लक्ष, दहांपैकी एकच व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येते, अन्य नऊजण लाच देऊन कामे करून घेतात. या सर्व कारणांमुळे शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैशाच्या मोहापुढे कारवाईची भीती शून्य वाटते. कोल्हापूर जिल्ह्यात मार्च २०१४ ते १४ सप्टेंबर २०१६ या कालावधीत ८४ गुन्हे दाखल आहेत, तर १५ जणांना शिक्षा लागली आहे. जिल्ह्यात लाचखोरांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्ट्रेशन, अन्न व औषध प्रशासन, कारागृह, महावितरण, आदी कार्यालयांत कामाच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये एकमेव पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागाचा कारवाईचा टप्पा सर्वाधिक आहे. त्यामुळे कोल्हापुरात लाचखोरांची संख्या जास्त असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महिन्याला चार ट्रॅप केले जातात. लाच देऊ नये, लाच देणे आणि घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, अशा पद्धतीने नागरिकांत प्रबोधन केले जात आहे. पोस्टरबाजी, पत्रकबाजी, प्रसारमाध्यमांतूनही जनजागृती केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती, कारवाई होत असतानाही लाच घेणे काही कमी झालेले नाही. लाच स्वीकारल्यानंतर तत्काळ जामीन मिळतो. काही गुन्ह्यांमध्ये उशिरा निकाल लागल्याने अधिकारी बदलून जातात, तर फिर्यादी नको ती कटकट म्हणून आरोपीलाच फितूर होतात. त्यामुळे अशा काही प्रकरणांत आरोपी निर्दोष सुटतात. या सर्व कारणांमुळे कारवाईची भीतीच राहिलेली नाही. अभ्यागत कक्ष बारगळलापोलिस दलातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्यातील पोलिस मुख्यालयासह सर्व पोलिस ठाण्यांमध्ये अभ्यागत कक्ष नेमून, लाच मागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंद ठेवण्याचे आदेश तत्कालीन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस अधीक्षकांना दिले होते. या आदेशाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.
पैशाच्या मोहापुढे कारवाईची भीती शून्य...!
By admin | Published: September 15, 2016 12:18 AM