Congress Jan Sangharsh Yatra भय आणि भाजपमुक्त महाराष्ट्र : अशोक चव्हाण यांचा निर्धार - काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला शक्तिप्रदर्शनाने सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:11 PM2018-08-31T22:11:36+5:302018-08-31T23:09:31+5:30

Fear and BJP-free Maharashtra: Ashok Chavan's determination - Congress's Jan Sangshsh Yatra starts with power | Congress Jan Sangharsh Yatra भय आणि भाजपमुक्त महाराष्ट्र : अशोक चव्हाण यांचा निर्धार - काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला शक्तिप्रदर्शनाने सुरुवात

Congress Jan Sangharsh Yatra भय आणि भाजपमुक्त महाराष्ट्र : अशोक चव्हाण यांचा निर्धार - काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला शक्तिप्रदर्शनाने सुरुवात

Next
ठळक मुद्देप्रचाराचे रणशिंग फुंकले

कोल्हापूर : महाराष्ट्र भय आणि भाजपमुक्त करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठीच काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरू केली असून, २०१९ च्या निवडणुकीत सरकारचे विसर्जन हेच या यात्रेचे ध्येय असल्याचे सांगून त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या उद्घाटन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे होते.

येथील केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यकर्त्यांच्या जल्लोषी वातावरणात हा मेळावा झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, आमदार विश्वजित कदम, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस, खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सचिन सावंत, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, डी. पी. सावंत, बसवराज पाटील, आशिष दुवा, शरद रणपिसे, सत्यजित तांबे, आनंदराव पाटील, आदी प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार सतेज पाटील हे संघर्षयात्रेचे समन्वयक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली यात्रेची जोरदार सुरुवात झाल्याने सर्वच नेत्यांनी त्यांचे कौतुक केले.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सत्तारूढ भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, ‘अरं, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!’ असे आम्हांला विचारून सत्तेत आलेल्या भाजपवाल्यांना आता रस्त्यावर उतरून हाच प्रश्न पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील फडणवीस सरकार हे गेंड्याला लाजवेल एवढ्या मुर्दाड कातडीचे आहे. सत्तेतून पैसा व पैशांतून सत्ता हाच खेळ सुरू आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठीच काँग्रेसने ही जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. सरकारबद्दल लोकांमध्ये एवढा उद्रेक आहे की, जनताच आता परिवर्तन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. निवडणुका उद्या जरी जाहीर झाल्या तरी त्याचा मुकाबला करण्यास काँग्रेस सज्ज आहे.’

श्री. खरगे म्हणाले, ‘जाति-धर्मांमध्ये तेढ वाढविण्याचे काम हीच पंतप्रधान मोदी यांची खरी उपलब्धी आहे. मोदी-फडणवीस यांचा कारभार खोटं बोल परंतु रेटून बोल या पद्धतीने सुरू आहे. देशात मोदी यांची हिटलरशाही सुरू आहे. पुरोगामी विचारवंतांचे खुनी चार वर्षे मोकाट आणि विचारवंतांवर मात्र नजरकैद असा सरकारचा व्यवहार आहे.’

गटतट विसरून काँग्रेस एकत्र आली तर तिला पराभूत करण्याची कुणाची हिंमत नाही. मला कोल्हापुरात आज तेच आशादायी चित्र दिसत असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘दाभोलकर खूनप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेला वैभव राऊत याच्या घरात २० जिवंत बॉम्ब सापडले ते कुणाविरुद्ध वापरले जाणार होते, हे जाहीर व्हावे. सरकारने या प्रकरणावरून लक्ष विचलित व्हावे यासाठीच विचारवंतांवर अटकेची कारवाई केली. दाभोलकर ते गौरी लंकेश या चार खुनांपैकी दोन खून एकाच पिस्तुलातून झाले आहेत. ते काय त्यांच्याकडे पिस्तूल घ्यायला पैसे नव्हते म्हणून नव्ह;े तर ते मंतरलेले पिस्तूल होते. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर दोनच दिवसांपूर्वी सनातन संस्थेविरुद्ध कारवाई करणार असल्याचे म्हणत होते. त्यांचे कान कुणीतरी पिरंगळल्यावर आता त्यांचीही भाषा बदलली आहे.’

देशात अघोषित आणीबाणी असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. ते म्हणाले, ‘डावे विचारवंत वारा राव यांच्या घरी गेलेले पोलीस त्यांच्या मुलीस तुम्ही हिंदू आहात तर मग कुंकू का लावत नाही? असे विचारत होते. घरी फुले, शाहू आंबेडकर यांचे फोटो का लावता? अशी विचारणा त्यांनी केली. फुले-आंबेडकर यांचे फोटो लावणे हा जर देशद्रोह आहे का? त्यांचे लावायचे नाहीत तर आम्ही जयंत आठवले यांचे फोटो घरात लावायचे का? अशी विचारणा विखे पाटील यांनी केली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘तीन-चार भांडवलदारांच्या हितासाठीच हे सरकार काम करत आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी रोज सरकारला उघडे पाडत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घराघरात जाऊन मोदी सरकारचा खोटेपणा उघड करावा.’
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘आपल्यासाठी २०१९ हीच शेवटची डेडलाईन आहे. त्यामुळे गटतट विसरून एक होऊ या.’

प्रास्ताविक करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘संघर्षयात्रेची मशाल कोल्हापुरात पेटली आहे, त्याचा वणवा महाराष्ट्रात पसरल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या ‘अरे’ला.. ‘का रे’ म्हणण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे, हे कोल्हापूरने दाखवून दिले.’
यावेळी नसीम खान, आमदार विश्वजित कदम यांचीही भाषणे झाली. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून संघर्षयात्रेसाठी तयार केलेल्या चित्रफितीचे अनावरण झाले. मेळाव्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मशाल पेटवली..!
या संघर्षयात्रेची सुरुवात ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते मशाल पेटवून झाली. तत्पूर्वी ताराराणी चौकातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व नेते संघर्ष रथात उभे राहून जनतेला अभिवादन करत होते. सायंकाळी कळंबा परिसरात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जंगी जाहीर सभा झाली.

मुहूर्त मंत्री
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजप सरकारमधील मुहूर्त मंत्री असल्याची टीका विखे-पाटील यांनी केली. मंत्रिमंडळाचा विस्तार, मराठा आरक्षण, कर्जमाफी, युती होणार की नाही हे सगळे तेच सांगत आहेत. तेव्हा आता त्यांनी सरकार कधी जाणार याचा मुुहूर्त सांगून टाकावा, असा टोला त्यांनी लगावला. पाटील हे साधा माणूस असल्याचे सगळे सांगतात; मग सांगली महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी कोट्यवधी रुपये उधळले ते कोठून आणले, याचीही चौकशी करावी, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.

दमदार सुरुवात
या संघर्षयात्रेचे नेटके नियोजन करून सुरुवात दणक्यात केल्याबद्दल खरगे यांच्यापासून ते विश्वजित कदम यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी आमदार सतेज पाटील यांचे कौतुक केले. आमदार सतेज पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला जशास तसे उत्तर देणारे दबंग आमदार आहेत असे विश्वजित कदम यांनी सांगितले.

जनतेला पश्चात्ताप
युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम म्हणाले, खोटी स्वप्ने दाखवून भाजप सत्तेवर आले; पण सामान्य माणसाला त्याचा पश्चात्ताप झाला आहे. निष्क्रिय सरकारला हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

दादांनी बजेट सोडून किती निधी आणला?
आमदार सतेज पाटील म्हणाले, कॉँग्रेस सरकारच्या काळात केलेल्या भूमिपूजनांचीउद्घाटने करण्याचे काम गेल्या चार वर्षांत भाजपने केले असून, कोल्हापूरची १०१ प्रलंबित प्रश्नांची यादी आहे. महापालिकेला एक रुपयाही न दिल्याने टीका झाली. मग बजेटमधील कामांची यादी भाजप नेत्यांनी जाहीर केली. आमच्या काळात आम्ही बजेट सोडून १२०० कोटींचा निधी कोल्हापूरच्या विकासासाठी आणला.

कोल्हापूरच्या लोकसभा जागेवर कॉँग्रेसचा दावा
कोल्हापूर कॉँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत कॉँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघावर कॉँग्रेस पक्षाने दावा करावा, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

व्हिडीओ क्लिपचे कौतुक
आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्यातील शिवसेना-भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा

यावेळी कार्यकर्त्यांनी सभागृह खचाखच भरून गेले होते. सतीश बरगे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी महापौर शोभा बोंद्रे, हुस्नबानू खलिफे, वीरेंद्र जगताप, रामहरी रूपनवर, राजन भोसले, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज साठे, प्रकाश सोनवणे, यशवंत हप्पी, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, सत्यजित तांबे, दिनकरराव जाधव, गणपतराव पाटील, प्रल्हाद चव्हाण, सुशील शंकरराव पाटील-कौलवकर, तौफिक मुलणी, राजू वाघमारे, प्रकाश सातपुते, संध्या घोटणे, सुप्रिया साळोखे, गुलाबराव घोरपडे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, पार्थ मुंडे, विद्याधर गुरबे, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Fear and BJP-free Maharashtra: Ashok Chavan's determination - Congress's Jan Sangshsh Yatra starts with power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.