संदीप खवळे / कोल्हापूर बेफिकीर पोलीस, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष अन् अस्वस्थ गांधीनगरवासीय, अशी आजची स्थिती आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यावरून गेले आठवडाभर सुरू असलेला वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. पुतळा अन्यत्र हलविल्याशिवाय बंद मागे घेणार नाही, अशी भूमिका सिंधी व्यापाऱ्यांनी घेतली आहे; तर दुसरीकडे, दलित संघटनांनी पुतळ्याला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यामुळे गांधीनगरात तणावपूर्ण वातावरण आहे. असा सुरू झाला वाद हा वाद सुरू झाला तो गांधीनगर येथील शिरू चौकातील न्यायप्रविष्ट असलेल्या जागेत बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून. दुर्गामाता मंदिराशेजारी रविवारी (दि. ११) मध्यरात्री अज्ञातांकडून डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला. हा पुतळा अन्यत्र बसवावा, या मागणीसाठी सिंधी समाजाने आठवडाभर बाजारपेठ बंद ठेवली आहे. शिरू चौक येथील गट क्रमांक २७७३ ची जागा ही शासनाच्या मालकीची असून, या जागेचे क्षेत्रफळ ३.२५ गुंठे आहे. सध्या ही जागा न्यायप्रविष्ट आहे. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा १९९४ मध्ये गांधीनगर ग्रामपंचायतीकडे व्यवस्थापनासाठी सोपविली. या जागेतील अर्धा गुंठा जागेमध्ये दोन वर्षांपूर्वी लालचंद खुबचंदानी यांनी दुर्गामातेचे मंदिर अनधिकृतरीत्या बांधले, आणि आता येथील रिकाम्या जागेत अज्ञातांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा आणून बसविला आहे. वादाचा फटका सर्वांनाच गेले आठवडाभर सुरू असलेल्या या वादाने गांधीनगर बाजारपेठेतील सुमारे एक हजार दुकानांतून होणारी रोजची ३० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. अद्याप पुतळा हलविण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे बाजारपेठ बंदच राहणार आहे. या ‘बंद’मुळे मालकांबरोबरच गांधीनगरात काम करणारे कामगार, हमाल, फेरीवाले, रिक्षावाले यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच कोल्हापूरसह कोकण आणि बेळगावातून गांधीनगरमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात; पण बाजारपेठ बंद असल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या बंदमध्ये आतापर्यंत सुमारे १५० कोटी रुपयांचे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. दररोज होणारा लाखो रुपयांचा तोटा सहन करून सिंधी बांधव पुतळा अन्यत्र हलवण्यात येईपर्यंत हा बंद सुरूच ठेवणार यावर ठाम आहेत; तर दलित संघटनांनीही पुतळा हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे यापूर्वी कधीही नसलेले तणावपूर्ण वातावरण गांधीनगरवासीय अनुभवत आहेत. तोडग्यासाठी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अन्यत्र हलवण्यात यावा, यासाठी आतापर्यंत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हा पोलीसप्रमुख, करवीर तहसीलदार यांच्यासोबत, तसेच गांधीनगर पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत सिंधी बांधव आणि ‘आरपीआय’च्या नेत्यांमध्ये आठवडाभरात बैठका झाल्या; पण दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे या बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही. सिंधी बांधवांनी ग्रामपंचायतीनेच हा पुतळा हलवावा, अशी मागणी केली; तर आंबेडकरी संघटनांनी न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत हा पुतळा हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे वाद चिघळत राहिला. पुतळ्यास पर्यायी जागा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. जुने गांधीनगर पोलीस ठाण्याचे प्रांगण, स्वामी शांतिप्रकाश उद्यान या पर्यायी जागा तहसीलदारांनी सुचविलेल्या आहेत. त्यांचा विचार झाल्यास हा वाद मिटेल , अशी अपेक्षा सिंधी बांधवांनी व्यक्त केली.
धगधगत्या गांधीनगरात उद्रेकाची भीती
By admin | Published: May 18, 2015 1:21 AM