वीकेंड लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू राहिले. मात्र, १५ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग, व्यवसाय बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणे रोजगार बंद राहिल्यास कोल्हापूरमध्ये राहणे, जेवणाचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे परजिल्हा, राज्यातील कामगारांनी आपल्या घरी, गावाकडे जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. वीकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी हॉटेल, रेस्टॉरंटसाठी निर्बंध लागू झाले. त्याचा परिणाम रोजगारावर झाल्याने अनेक हॉटेल कर्मचारी आपल्या गावांना गेले आहेत. गेल्या वर्षी परराज्यातील बांधकाम कामगार त्यांच्या राज्यात गेले होते. औद्योगिक वसाहतींमध्ये निम्मे कामगार हे कामावर येत होते. आता १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यास रोजगार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असणारे अनेक कामगार आपल्या गावांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊनमध्ये काय निर्बंध राहणार, कोणत्या सवलती राहणार याबाबत शासनाकडून जाहीर होणाऱ्या आदेश, माहितीची प्रतीक्षा लागली आहे.
चौकट
आम्ही कामगारांची व्यवस्था करणार
ज्या कामगारांना गावाला जाणे शक्य नाही. त्यांची व्यवस्था आम्ही करणार आहोत. कामगार हे आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यामुळे कोणत्याही कामगाराला कमी करणार नाही. त्याबाबत आम्ही हॉटेल व्यावसायिकांनी चर्चा केली असल्याचे कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसला असून रोजगाराचे प्रमाण कमी झाले आहे. निम्म्याहून अधिक कर्मचारी आपापल्या गावी गेले आहेत. सरकारने आम्हाला मदतीचा हात द्यावा.
-सुशांत पोवार, हॉटेल कर्मचारी, कोल्हापूर.
गेल्या एप्रिलपासून आम्ही कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून काम करत आहोत. आम्हाला लॉकडाऊनची धास्ती वाटत आहे. कामगारांचा विचार करता गेल्या वर्षीप्रमाणे लॉकडाऊनमध्ये उद्योगांना सवलत देता येईल का? याचा विचार करावा. लॉकडाऊन होणारच असेल, तर शासनाने आम्हा कामगारांना अनुदान द्यावे.
-शिवाजी पाटील, कामगार, गोकुळ शिरगाव एमआयडीसी.