राजाराम लोंढेकोल्हापूर : सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा सप्टेंबरपर्यंत घेता येतात, पण यंदा सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. मागील विधानसभेचे वेळापत्रक पाहिले तर २० सप्टेंबरला निवडणूक जाहीर होऊ शकते, त्या अगोदर ६ ते १७ सप्टेंबर गणेशोत्सव आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच सभा घेण्यासाठी संस्थाचालकांची धांदल उडाली आहे. ताळेबंद बांधून, लेखापरीक्षण करून अहवाल छापावे लागतात. त्याचबरोबर सभेच्या अगोदर किमान १५ दिवस सभासदांना नोटीस द्यावी लागत असल्याने संस्थांच्या पातळीवर सभेच्या नियोजनाची गडबड सुरू झाली आहे.
आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्याचे लेखापरीक्षण करून घेऊन ताळेबंद निश्चित करून घ्यायचा असतो. त्यानंतर तो ताळेबंद सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवून सभासदांकडून मान्यता घ्यायची असते. केंद्र सरकारने ९७ वी घटना दुरुस्ती केल्यानंतर सहकारातील कायदे बदलले आहेत. या घटनादुरुस्तीनंतर मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्याचे पुढील तीन महिन्यात लेखापरीक्षण करून घेऊन ताळेबंद निश्चित करून घ्यायचा असतो. त्या पुढच्या तीन महिन्यात म्हणजेच सप्टेंबर अखेर सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांकडून तो मंजूर करून घ्यायचा असतो.जिल्ह्यातील ‘गोकूळ’, ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’, या शिखर संस्थांसह साखर कारखाने, तालुका व जिल्हास्तरीय वित्तीय संस्थांसह प्राथमिक संस्थांच्या सभांचे नियोजन संस्थाचालक करत असतात. जुलै व ऑगस्टमधील पाऊस व पूरस्थिती पाहता तालुकास्तरीयसह शिखर संस्थांच्या सभा या सप्टेंबरमध्येच घेतल्या जातात. पण, यंदा विधानसभेची रणधुमाळी सप्टेंबरमध्येच सुरू होणार आहे. तत्पूर्वी ६ ते १७ सप्टेंबर गणेशोत्सव असल्याने २० सप्टेंबरला निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल. यामुळे संस्थांच्या सभांचा धडाका ऑगस्टमध्येच उडणार, हे निश्चित आहे.
‘गोकूळ’ची ३० ऑगस्टला सभाकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकूळ) सभा गेल्या आठ वर्षात वादळी होते. यंदा ३० ऑगस्टला सभा होत आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील सहकार :जिल्हा बँक : ०१जिल्हा दूध संघ : ०१साखर कारखाने : १६विकास संस्था : १,८७७नागरी बँका : ४२शिक्षक बँक : ०१नोकरदार पतसंस्था : ३४९इतर ग्रामीण पतसंस्था : १३००तालुका खरेदी-विक्री संघ : १६जिल्हा कृषी औद्योगिक : ०२फळेभाजीपाला पणन : २८दूध संस्था : ५,९९०२०१९ निवडणूक अशी होतीअधिसूचना : २१ सप्टेंबरउमेदवारी अर्ज दाखल करणार सुरुवात : ७ ऑक्टोबरमतदान : २१ ऑक्टोबरमतमोजणी : २४ ऑक्टोबर