लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रशासक नियुक्त झाल्यावर सर्वसामान्य नागरिकांची कामे होतील की नाही, अशी शंका घेण्यात येत होती. प्रस्तापित अधिकाऱ्यांनाही आता आपलेच राज्य येणार असे वाटले होते. तृतीय व चतुर्थश्रेणीचे कर्मचारीही काहीसे ‘आपण करू तीच दिशा’ अशा आविर्भावात होते; परंतु अल्पकाळातच महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी कवाळे यांनी प्रशासनावर वचक तर ठेवालाच, शिवाय त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यावरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
प्रशासक राजवट म्हणजे ‘हम करेसो कायदा’ अशीच प्रवृत्ती असावी असा भास सर्वसामान्य नागरिकांना झाला होता. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात असल्यामुळे नागरिक सहजपणे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना भेटून कामे सांगत होते. अधिकारी त्यास दाद द्यायचे नाहीत. कामात टाळाटाळ करायचे, नागरिकांची दमछाक करायचे. एकेका कामास सहा- सात महिने हेलपाटे मारायला लागायचे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या काळात सुद्धा नागरिकांना लवकर न्याय मिळायला वेळ लागायचा.
जेव्हा महापालिका सभागृहाची मुदत संपली आणि नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात आले, तेव्हा प्रशासक आल्यामुळे काही खरे नाही. सर्वसमान्यांना न्याय मिळणार नाही, अशीच शंका शहरवासीयांच्या मनात येत होती. महापालिकेचे प्रस्थापित अधिकारी, कर्मचारी तर लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या त्रासातून मुक्त झाल्यामुळे काहीसे आनंदात होते. आता आपलेच राज्य आहे, असे त्यांना वाटत होते;
पण प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दीड- दोन महिने महापालिकेचा अभ्यास केल्यानंतर काय केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कामे झटपट झाली पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली याची माहिती त्या प्रत्येक आठवड्याला घेतात. जर झाले नाही तर का झाले नाही म्हणून ‘खरपूस’ शब्दात समाचारही घेतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तक्रारींचे प्रमाण शू्न्यावर आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.
- अशी आहे बलकवडेंची कार्यपद्धत-
नागरिक बुधवार व गुरुवारी तक्रारी घेऊन येतात तेव्हा सर्व विभागाचे प्रमुखांना नजीकच्या मीटिंग हॉलमध्ये बसण्याची सक्ती आहे. नागरिकांचा प्रश्न ज्या विभागाशी आहे, त्यांना बोलावून त्यांच्या समक्ष प्रश्नाचा सोक्षमोक्ष होतो. बऱ्याच वेळा काही नागरिक पूर्व संमतीशिवाय भेटायला येतात. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेऊन चर्चा केली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांना खोटे बोलता येत नाही आणि कामही टाळता येत नाही. प्रशासकांना नागरिक सहजपणे भेटू शकतात.
- रात्रभर काम करायला लावले-
घरफाळा विभागाने थकबाकी वसुलीकरिता योजना लागू केली. दि. १७ फेब्रुवारीस बलकवडे यांनी प्रस्तावावर सही केली; परंतु त्या प्रस्तावावर सहायक आयुक्त कार्यालयाकडून ई गव्हर्नन्स विभागाला दि. २५ जानेवारीपर्यंत सूचनाच गेली नाही. ही बाब लक्षात येताच बलकवडे यांनी सहायक आयुक्तांना तर चांगलेच धारेवर धरले. शिवाय सिस्टीम मॅनेजरना रात्रभर काम करा, उद्यापासून अंमलबजावणी झाली नाही तर ‘याद राखा’ असा दम भरला.