कोल्हापूर : पोलिसांची भीती दाखवून एकास बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील दहा हजारांच्या रोकडसह सुमारे १६ हजाराचा मुद्देमाल लुटल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना उमा चित्रमंदिरनजीक घडली. याबाबत सत्यजीत शिवाजीराव मुळीक (वय ४८ रा. राजारामपुरी १३ वी गल्ली, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सत्यजीत मुळीक हे सोमवारी दुपारी उमा चित्रमंदिरनजीक लघुशंकेसाठी गेले असता अनोळखी व्यक्तीने तेथे येऊन त्यांना तू येथे का थांबलास? असा जाब विचारुन पोलिसांनाच बोलवतो, अशी भीती दाखवून त्यांच्या कानशीलात लगावली. तसेच त्यांच्या पँटच्या खिशातील पाकीट व मोबाइल संच जबरदस्तीने काढून येऊन पोबारा केला. या पाकिटात रोख १० हजार रुपये तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. याबाबत मुळीक यांनी अज्ञात व्यक्तीने मारहाण करून सुमारे १६ हजारांचा मुद्देमाल लुटल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिसात दिली.