कोल्हापूर : शहरातील कोणत्याही फेरीवाल्यांवर अन्याय होऊ नये, त्यांचा हक्क त्यांना प्राप्त व्हावा, सर्व घटकांतील फेरीवाल्यांना संरक्षण मिळावे याकरिता सर्व फेरीवाल्यांनी संघटितपणे लढाईसाठी सज्ज राहण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी शहरातील सर्व फेरीवाल्यांचा एक महामेळावा लवकरच घेण्याचा निर्णय झाला. मंगळवारी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या बैठकीत महामेळावा घेण्यावर एकमत करण्यात आले. बैठकिच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर नंदकुमार वळंजू होते. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे येत्या दोन-चार दिवसांत शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे संकेत मिळाल्यानंतर सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावतीने कम्युनिस्ट पक्षाच्या बिंदू चौकातील कार्यालयात बैठक घेण्यात आली.प्रास्ताविकपर भाषणात फेरीवाला कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार यांनी सर्व फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनाबाबत सविस्तर माहिती विशद करून फेरीवाला कृती समिती व महानगरपालिका प्रशासनाच्या बैठकीत वेळोवेळी आपण आपल्या निर्णयाशी ठाम असल्याने फेरीवाल्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.माजी नगरसेवक अशोकराव भंडारे यांनी, फेरीवाला समिती व महापालिका प्रशासनाच्या झालेल्या वळोवेळच्या बैठकीत कोणतेही गांभीर्य नसल्याचे सांगून प्रशासनाच्या निर्णयावर विसंबून अगर विश्वास न ठेवता आपला अधिकार हक्क प्राप्त करून घेण्यासाठी एक व्यापक लढा उभा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. समीर नदाफ यांनी, प्रभाग समितीच्या झालेल्या बैठकीत आणि प्रत्यक्षात प्रशासन करत असलेल्या कार्यवाहीबाबत आकडेवारीत तफावत असून, यामधून काय आणि कशा पद्धतीने पुनर्वसन होणार याबाबत फेरीवाल्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे सांगितले. महमंद शरीफ शेख यांनीही, पापाची तिकटी ते खाटिक चौक परिसरातील फेरीवाल्यांचा निर्णय प्रशासनाने घेतला नसल्याचे सांगून त्याच्या पुनर्वसनाबाबत अद्याप निर्णय होत नसल्याने येथील फेरीवाले चिंताग्रस्त झाले आहेत, असे सांगितले. सुरेश जरग यांनी, ज्यांच्याकडे बायोमेट्रिक कार्ड असतील त्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी होणार असल्याने सर्व फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक कार्ड घेण्यासाठी योग्य ते शुल्क भरण्यासाठी आग्रही राहावे, असे सांगितले. यावेळी भाऊसाहेब गणपुले, कॉ. दिलीप पवार, रमाकांत उरसाल, मारुती भागोजी, अरुण शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, फेरीवाला कृती समिती आणि प्रशासन यांच्यात पुनर्वसनाबाबत वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले, त्याबाबत आपण आशावादी असल्याचे सांगितले. महापालिकेच्या योग्य व न्याय कारवाईस सर्वपक्षीय फेरीवाला समिती त्यांच्यासोबत राहणार आहे तरीही फेरीवाल्यांनी गाफील न राहता महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन केले. बाबासाो मुल्ला, विजय नागवेकर, बाळासाहेब कागलकर, शांताबाई गुरव, सुलोचना यादव, दिलीप बावणे, विठ्ठल येडगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पालिकेचे कारवाईचे संकेतमहापालिकेतर्फे शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे संकेतसर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावतीने कम्युनिस्ट पक्षाच्या बिंदू चौकातील कार्यालयात बैठक
फेरीवाल्यांनी लढ्यासाठी सज्ज व्हाव
By admin | Published: March 25, 2016 12:33 AM