आजरा : मोबाईलच्या डीपीला माझा फोटो लाव, नाहीतर मी तुझ्याशी लग्न नाही करणार असे म्हणून त्रास दिला. तसेच आजरा बसस्थानकावर किशोर दत्तात्रय सुरंगे (रा. महागाव, ता. गडहिंग्लज) याने मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून मुलगी सविता खामकर हिने आत्महत्या केल्याची तक्रार सविताचे वडील नारायण खामकर (रा. पोळगाव) यांनी आजरा पोलिसांत दिली आहे.
मंगळवारी दुपारी सविता हिने आई-वडील शेताकडे गेले असताना घराच्या तुळईला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. सविता (वय १६) ही अकरावी कॉमर्समध्ये शिकत होती. महागाव येथील किशोर सुरंगे व सविता खामकर यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमातून किशोरच्या आई-वडिलांनी सविताच्या वडिलांना लग्नाकरिता घर बघण्यास बोलावून घेतले. त्यावेळी नारायण खामकर यांनी आपल्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्नाचा निर्णय घेऊ, असे सांगितले होते.
तरीही किशोर हा सविताला मोबाईलच्या डीपीला आपला फोटो लाव, नाहीतर मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून वारंवार शिवीगाळ, मारहाण करून मानसिक त्रास देत होता. मंगळवारी किशोरने सविताला आजरा बसस्थानकावर याच कारणावरून मारहाण केली. या त्रासाला कंटाळून व नैराश्यातून सविताने घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद दिल्याने महागावच्या किशोर सुरंगे या तरुणाविरुद्ध आजरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.