कोल्हापूर : निवडणूक संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी दूध उत्पादकांना पशुखाद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या ‘मयूर’सह ‘गोकुळ’नेही प्रतिकिलो दोन रुपये वाढ जाहीर केली आहे. ही वाढ लगेच लागूही झाली आहे. या वाढीला कच्च्या मालाची उपलब्धता, इंधनासह वाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीचे कारण संघाकडून देण्यात आले आहे.मंगळवारी (दि. २३) लोकसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या मयूर या ब्रॅँडने तीन टप्प्यांत दरवाढ केली. प्रतिकिलो दोन रुपयांप्रमाणे ५० किलोंच्या पोत्याला ६० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. याच्या दुसऱ्याच दिवशी ‘गोकुळ’च्या महालक्ष्मी ब्रॅँडच्या पशुखाद्यातही दोन रुपयांची वाढ झाली.
ही वाढ पोत्यामागे १०० रुपये आहे. ‘महालक्ष्मी गोल्ड’चा दर १९ रुपयांवरून २१ रुपये प्रतिकिलो झाला आहे, तर महालक्ष्मी मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे. काफ स्टार्टरमध्येही दोन रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे.उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात कमालीची घट जाणवत आहे, जनावरांच्या आजारपणावरील खर्च वाढला आहे. त्यात यंदा साखर कारखाने लवकर बंद झाल्याने ओल्या वैरणीचीही टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. ओल्यासह सुक्या वैरणीचे दरही भडकलेले आहेत. अशा परिस्थितीत जनावरे जगविणे जिकिरीचे होत असताना आता पशुखाद्यातही वाढ झाल्याने दूध उत्पादक हवालदिल झाला आहे.
गोकुळ पशुखाद्य दर (प्रतिकिलो)खाद्यप्रकार प्रमाण जुने दर नवीन दर
- महालक्ष्मी गोल्ड ५० ९५० १०५०
- मिल्क रिप्लेसर १० ५०० ५५०
- काफ स्टार्टर २५ ६०० ६५०
- फिडींग पॅकेज ३५ ५६० ६१०
कच्च्या मालामुळेच दरवाढगेले वर्षभर कोणतीही दरवाढ झालेली नव्हती; पण आता दुष्काळी परिस्थितीमुळे कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, डिझेल, वाहतुकीसह वीज दरवाढीमुळे ही वाढ करण्याशिवाय संघासमोर पर्याय नव्हता. संघाचा तोटा वाढत असल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.रवींद्र आपटे,चेअरमन, गोकुळ दूध संघ
दूध उत्पादकांचे कंबरडे मोडलेपशुखाद्याचे दर गेल्या चार वर्षांत दुपटीने वाढले आहेत. त्या तुलनेत दुधाच्या खरेदीदरात मात्र एक रुपयाही वाढ झालेली नाही. वैरणीचे दरही वाढलेले असल्याने जनावरे सांभाळणे अवघड होऊन बसले असताना आता पशुखाद्यांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने आमचे कंबरडेच मोडले आहे. नफा राहू दे, एकूण खर्च वजा जाता शेणाशिवाय हातात काहीच पडत नसल्याने आमचे सगळे आर्थिक चक्रच विसकटले आहे.आकाश पाटील,जांभळी, ता. शिरोळ (दूध उत्पादक )