‘मरण कुणाला टळलंय बाबा, आज त्यो गेला उद्या आपण....'
आपल्या पोटच्या पोराचा मेल्यानंतर तोंडसुद्धा बघता न आलेली आक्का मनाला सावरता सावरता उरलासुरला आयुष्याचा संसार मुठीत धरून जगण्याचं तत्त्वज्ञान माझ्या कानात ठासून भरताना मला कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण वाटला, तर दुःखाला नि सुखाला जगण्याची आसक्ती घट्ट चिकटलेली असते. जगताना अनेक बरे वाईट प्रसंग येत असतात. आपण या हा भवसागर पार करायलाच हवा. आपण दुःखमुक्त होण्यासाठी सम्यक व्हायला हवं असं सांगणारा ती बुद्ध वाटली. काळ नि वेळ, सुख नि दुःख कधी घरं बांधून माणसांच्या जीवनात राहत नसतात हे तत्त्वज्ञान सांगणारी महान विभूती वाटली. जिच्या माथ्यावर कपटानं या नियतीनं अखंड कष्ट कोरलं त्या नियतीचा मला क्षणभर खूप रागही आला. माणसाला दुःखं किती असावीत नि किती संघर्ष असावा याचा महासातबारा म्हणजे माझी आक्काच फक्त आहे असंही नकळत वाटत होतं. पण घरातलं कर्ता कोण अकाली गेलं कि त्या घराची काय वाताहत होत असते हे समोर बघून मी मनानं पुरा उद्ध्वस्त झालो हुतो. हे बघून भावजी नि आक्का मलाच धीर द्यायला लागल्याली बघून मी खूप भारावून गेलो. आयुष्य सारं संघर्षमय झालं की माणसं शांतपणे ही जगण्याची लढाई कशी लढत असतात हे मी नागड्या डोळ्यांनी बघत असताना मला आक्का नि भावजीचा एकिकडं ते दुःखातून सावरल्याचा आनंद वाटत हुता. दुःखानं खचून न जाता काळाच्या छाताडावर उरलंसुरलं आयुष्य कोरण्याची आक्काची धडपड काळजाला हेलावून टाकत हुती.
या वैश्विक महामारीत स्वच्छतेच्या नियमानं जगला तो वाचला नि दुःखाला पाठीवर टाकला तोही जगला हाच जणू आक्का संदेश देत असताना अस्वस्थ काळालाही धडकी बसली असावी.
आपण सावरायलाच हवंय. येळ लय वाईट आलीय. काळ भयान नाचू लागलाय पोरांनू. हिकडं तिकडं उगाच फिरू नका. तोंडावर रुमाल न्हायत मास्क लावा. जीव जगला तर सारं मिळालं. आज माझं लेकरू गेलं कोरोनानं. आरं अशी किती माणस गेली. कुणाचा बा गेला. कुणाची माय गेली कुणाची लेक गेली कुणाची आजी गेली, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा नवरा गेला .कुणाची बायकू गेली तर कुणाचा आज्जा.......
ह्यो कोरोना कुणा-कुणाला उघड्यावर पाडणार हाय कुणास ठाऊक. पण लेकरांनू आपण धीर सोडून चालायचं न्हाय. या कोरोनाशी आता आपण चार हात करायला तयार व्हऊया. सारं जगच हवालदिल झालंय, मग आपण किस झाड कि पत्ती. आपल्या दुःखाला न डगमगता आल्या संकटांना सामुदायिक स्वच्छता, बाजारात गेलं तर घरी आल्यावर साबणानं हात धुवा. अंघोळ करा. स्वच्छ व्हा. असं बाडबाड बोलत असताना बोलताना अंतर ठेवा. कुठं थुंकू नका. असा संदेश देताना आपल्या लेकराचं मरण विसरल्याली बघून अस्वस्थ काळाच्याही संवेदना मुक्या झाल्या हुत्या.
000000