कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, अभिषेक, महापूजा, हलगीचा कडकडाट, गगनचुंबी सासनकाठ्यांची मिरवणूक, पालखी सोहळा, उन्हाच्या तडाख्यातही देवाच्या ओढीने लांबचा प्रवास करून आलेले लाखो भाविक आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीने सगळ्यांवर चढलेला भक्तीचा गुलाली रंग अशा मंगलमयी आणि उत्साही वातावरणात शुक्रवारी वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दुसºया टप्प्यातील मतदानाचा थेट परिणाम भाविकांच्या संख्येवर दिसून आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या रोडावली.
श्री जोतिबाचा सर्वांत मोठा उत्सव म्हणून चैत्र यात्रेचे महत्त्व आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात येथील लाखो भाविक या यात्रेसाठी येतात. त्यानिमित्त गेल्या पाच दिवसांपासूनच डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवारी तर डोंगर भाविकांची गर्दी आणि गुलाली रंगाने न्हाऊन निघाला होता. पहाटे पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते देवाची शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर बैठी सरदारी रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. यंदा सासनकाठ्यांची मिरवणूक एक तास आधी म्हणजेच दुपारी बारा वाजता सुरू झाली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासनकाठी क्रमांक एक या मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार सत्यजित पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, नायब तहसीलदार अनंत गुरव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पवार, सहसचिव एस. एस. साळवी, सरपंच राधा बुणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शिवाजीराव सांगळे उपस्थित होते.
विविध रंगांनी, फुलांनी सजलेल्या सासनकाठ्या आणि गुलाली रंगाने जोतिबा मंदिर भक्तिरंगात रंगून गेले. उन्हाचा तडाखा असला तरी भाविकांच्या उत्साह मोठा होता. बैलगाड्या, खासगी वाहने, एस. टी. बसेसने आलेले भाविक गुलाल आणि खोबºयाची उधळण करीत देवाच्या नावाचा गजर करीत होते. देहभान विसरून सासनकाठी नाचवतानाच तिचा भार दोरांच्या साहाय्याने शिताफीने पेलत होते.