कोल्हापूर : रिक्षात विसरलेली महिलेची १५ हजार रुपयांची रक्कम व महत्त्वाची कागदपत्रेप्रामाणिकपणे परत केल्याबद्दल रिक्षाचालकाचा शाहूपुरी पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जमीर रशीद मुल्ला (वय ४०, रा. लिशा हॉटेलशेजारी, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.अधिक माहिती अशी, राजारामपुरी २ री गल्ली येथे राहणाऱ्या प्राची मिलिंद मांगलेकर (३८) या गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास रिक्षामध्ये बसून एका हॉस्पिटलपासून ते मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी प्रवास करून रिक्षातून उतरल्या. घाईगडबडीने त्या उतरल्याने त्यांची बॅग रिक्षामध्येच राहून गेली.
तासाभरानंतर घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला; परंतु रिक्षाचालक ओळखीचा नाही, रिक्षाचा नंबर माहिती नसल्याने त्या सैरभैर झाल्या होत्या. रिक्षाचालक जमीर मुल्ला यांनी पाठीमागे सीटवर असलेली बॅग उघडून पाहिली असता, त्यामध्ये १५ हजार रोकड आणि दवाखान्याची कागदपत्रेदिसून आली. त्यावरील फोनवरून त्यांनी प्राची मांगलेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून शाहूपुरी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
मुल्ला यांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची भेट घेऊन त्यांच्या ताब्यात बॅग दिली. मांगलेकर या पोलीस ठाण्यात आल्यानंतर खातरजमा करून त्यांची पैसे व कागदपत्रेअसलेली पर्स परत केली. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी मुल्ला यांचा पोलीस ठाण्यात सत्कार केला.