बेळगाव : कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनावेळी गोळीबार करून नऊ निष्पाप मराठी भाषिकांचे बळी घेणाऱ्या तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख के. नारायण यांचा रविवारी कन्नड संघटनांनी सत्कार केला. या सत्कारातून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे . कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या कार्यक्रमात कन्नड संघटनेच्या नेत्यांनी स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन के. नारायण यांचा सत्कार केला. के. नारायण यांच्या सत्कारामुळे मराठी भाषिकांत संतापाची लाट पसरली आहे. १९८६ मध्ये झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनाच्या वेळी शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज नेते सहभागी झाले होते. त्यावेळी मराठी भाषिकांचे आंदोलन चिरडण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख के. नारायण यांनी अमानुष लाठीमार,अश्रुधूर आणि गोळीबार केला होता. यात नऊजणांचे बळी गेले होते.आज अठ्ठावीस वर्षे उलटली तरी मराठी भाषिक के. नारायण यांनी केलेला अत्याचार विसरले नाहीत. अहिंसात्मक मार्गाने लढा सुरूआहे याचा अर्थ काही केले तर मराठी माणूस सहन करेल अशा भ्रमात कोणी राहू नये, अशा शब्दांत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील यांनी नोंदवली. मराठी भाषिकांना डिवचण्याचा कन्नड संघटना आणि कन्नडिग प्रयत्न करीत आहेत त्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मराठी भाषिक युवा आघाडीचे सरचिटणीस महादेव पाटील यांनी व्यक्त केली.आपण निष्पापांचे बळी घेतल्याविषयी निवृत्तीनंतरही के. नारायण यांना पश्चाताप होत नाही. उलट त्यावेळी गोळीबार केल्यामुळे कन्नड सक्ती विरोधातील आंदोलन शांत झाले. आपण फक्त कर्तव्य बजावले, अशी दर्पोक्तीही नारायण यांनी केली. माजी महापौर सिद्धनगौडा पाटील, अशोक चदरगी यांच्यासह मूठभर कार्यकर्ते सत्कार समारंभाला उपस्थित होते . (प्रतिनिधी)नाडोज प्रतिष्ठानचा अरविंद पुरस्कारमाजी पोलीस अधीक्षक के. नारायण यांना नाडोज प्रतिष्ठानच्यावतीने के. अरविंद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कन्नड दैनिक नाडोज यांच्या वतीने आय.एम.ई.आर सभागृहात हा पुरस्कार देण्यात आला. कन्नड ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कम्बार यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
मराठी भाषिकांवर गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार
By admin | Published: December 07, 2015 12:51 AM