कोल्हापूर : लाळखुरकतचे १०० टक्के लसीकरण झाल्याने जिल्ह्यात लाळीची साथ येऊनही म्हारूळ (ता. करवीर) येथील एकाही जनावराला या साथीची लागण झाली नाही. या ‘लाळखुरकत’मुक्त गावातील दूध संस्था प्रतिनिधींचा सत्कार ‘गोकुळ’च्या वतीने अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते करण्यात आला.लाळीची साथ येऊ नये म्हणून ‘गोकुळ’च्या वतीने लसीकरणाची मोहीम दरवर्षी राबविली जाते; पण हे लसीकरण केल्यानंतर जनावरे दूध कमी देतात, म्हणून पशुपालक लसीकरण करून घेण्यास टाळतात.
यंदा जिल्ह्यात लाळखुरकतची साथ होती, यामध्ये अनेक जनावरे दगावली; पण म्हारूळ (ता. करवीर) या गावातील दूध उत्पादकांनी १०० टक्के लसीकरण करून घेतले; त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे लाळीची साथ असताना म्हारूळमधील एकाही जनावराला लागण झाली नाही. याची दखल घेऊन ‘गोकुळ’च्या वतीने दूध संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार रवींद्र आपटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संचालक विश्वास पाटील, अरुण नरके, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, विश्वास जाधव, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, बाबा देसाई, राजेश पाटील, अनिल यादव, जयश्री पाटील, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील, डॉ. यु. व्ही. मोगले, आदी उपस्थित होते.