ठळक मुद्देअजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.
इंदुमती गणेश।नर्मदा नदीवर साकारलेल्या सरदार सरोवर धरणामुळे महाराष्ट्र, गुजरात, आणि मध्य प्रदेशातील ५० हजारांहून अधिक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. आजतागायत न झालेले पुनर्वसन, शेतीवाडी, घरं या मूलभूत हक्कांसाठी हाती तीर-कमान असलेल्या आदिवासींकडून सुरू असलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत... या पार्श्वभूमीवर निर्मात्या शिल्पा बल्लाळ यांनी नुकत्याच ‘लकीर के इस तरफ’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. यानिमित्ताने त्यांची घेतलेली चर्चेतील मुलाखत...प्रश्न : सरदार सरोवर धरण परिसरातील विस्थापितांचे प्रश्न काय आहेत ?उत्तर : नर्मदा नदीवर धरण बांधताना बाधित होणाऱ्या कुटुंबांना विश्वासातच घेतले गेले नाही. ५० हजार कुटुंबांपैकी केवळ ३५ हजार कुटुंबे शासनाच्या पुनर्वसन यादीत आहेत. १६ हजार कुटुंबांना अचानक सांगण्यात आले की, तुमचे पुनर्वसन होणार नाही. धरणात किती पाणीसाठा होतो, हे पाहण्यासाठी यंदा पावसाळ्यात धरणातून पाणीच सोडण्यात आलेले नाही. केवळ साठा वाढविला जात आहे. त्यामुळे गावंच काय, नवीन वसाहतीही पाण्यात बुडाल्या आहेत. वीजनिर्मिती शून्य, त्यांनी वायदा केल्याप्रमाणे कच्छपर्यंत तर पाणीच पोहोचले नाही.प्रश्न : ३५ वर्षे लढा सुरू राहण्यामागचे रहस्य काय?उत्तर : हे खरं आहे की आंदोलन दाबलं जातंय, त्यांच्या हक्कांची पायमल्ली केली जात आहे, सगळ्या बाजूंनी गळचेपी आणि त्यांना कोंडीत पकडले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता असं वाटतंय की नर्मदा बचाव आंदोलन आता संपलं आहे; पण आदिवासींच्या हातात हत्यार असले तरी ते खूप शांतताप्रिय आणि अहिंसावादी आहेत. या आंदोलनाचा लोगोही ‘जमिनीत रोवलेला बाण’ असा आहे. या आदिवासींची मूल्यं, मेधातार्इंनी सांभाळलेली धुरा आणि स्त्रीवादाचा प्रभाव हे मला या आंदोलनाच्या यशाचे रहस्य वाटते. अजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.*नर्मदा नदीवर १३५ मध्यम, ३० मोठी व तीन हजार लहान धरणं आहेत.*सर्वांत मोठ्या सरदार सरोवर धरणाची उंची : १३८.६८ मीटर*आलेला खर्च : ६० हजार कोटी रुपये*बुडालेली गावं : महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील २४५ गावं*बुडीत जमीन : ३७ हजार ६९० हेक्टर*विस्थापित नागरिक : ५० हजार कुटुंबे व अडीच लाखांहून अधिक नागरिक*पुनर्वसित झालेली कुटुंबे : ११ हजारस्त्रीवाद, आदिवासी मूल्ये हीच नर्मदा बचाव आंदोलनाची शक्ती- : शिल्पा बल्लाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:52 AM