कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजारातून मेथी दुर्मीळ झाली होती. आता हिरव्यागार मेथीच्या पेंढ्यांनी बाजार फुलला असून, पेंढीचा दर १0 रुपये झाला आहे. कोथिंबीरचीही तशीच परिस्थिती असून, दरही १0 रुपयेच आहेत.
मागील तीन-चार आठवडे ८0 रुपये किलोवर पोहोचलेला वांग्यांचा दर कमी झाला असून, २५ ते ३५ रुपये किलो असा झाला आहे. लाल भडक टोमॅटोचे ढीग लागले असून, १५ रुपये किलो असा दर आहे. किलोला ४0 रुपयांवर गेलेल्या कांद्याने मात्र ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.गेल्या दीड-दोन महिन्यांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा सर्वाधिक फटका कृषी मालाच्या बाजारपेठेला बसला होता. भाज्यांचा सुकाळ अनुभवणाऱ्या श्रावण महिन्यात भाज्यांच्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते.
वांगी, गवारी, भेंडीपासून ते सर्वच पालेभाज्या महाग झाल्याने आणि उपलब्धता कमी असल्याने कडधान्यावरच आहाराची गरज भागवली गेली; पण आता गेल्या आठवड्यापासून उघडलेल्या पावसामुळे बाजारात फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ताज्या लुसलुशीत आणि आकर्षक भाज्यांनी बाजार फुलून गेला आहे. दरही फारच कमी झाल्याने बाजारात भाजी खरेदीचा आनंद लुटला जात आहे.कडक ऊन पडल्याने रविवारी लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात सकाळपासून भाजी खरेदीसाठी गर्दी झाली होती. आतापर्यंत दुर्मीळ असलेली मेथी आता मुबलक प्रमाणात आली आहे.
याशिवाय कांदा पात, शेपू, चवळी, पालक, आदी भाज्या १0 रुपयांना पेंढी आहेत. कोथिंबिरीची मोठी पेंढी १५ ते २0, तर लहान ५ ते १0 रुपयांना मिळत आहे. याशिवाय श्रावण घेवडा, वाल, वरणा, ढबूचा दर २0 रुपये किलो झाला आहे.
गवारीदेखील १0 ते १५ रुपये पावशेर आहे. भेंढीचे दर मात्र २0 रुपये पावशेरवर स्थिर आहेत. १५ दिवसांपूर्वी शंभरी गाठलेली वांगी आता २५ ते ३५ रुपये किलोपर्यंत खाली आली आहेत. शेवगा शेंग व मुळा १0 रुपयांना तीन नग आहे. हिरव्या मिरचीचे दर अजूनही गडगडलेलेच असून, २५ ते ३0 रुपये किलोचा दर आहे.