कोल्हापूर : सर्व समाजघटकांनी एकत्र येत, एकीचे दर्शन घडवत, ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्धार सर्वधर्मिय प्रतिनिधींच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय बारा बलुतेदारांनी देशात आदर्शवत ठरणाऱ्या या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन बैठकीचे संयोजक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी यावेळी केले.सर्वधर्मियांनी शाहूनगरीत एकत्र येत, शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याच्या नियोजनासाठी शाहू स्मारक मिनी हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीसाठी सर्वधर्मीय व बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माजी नगरसेवक अशोक भंडारे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मार्गदर्शन करताना वसंतराव मुळीक म्हणाले, शिवाजी महाराज हे कोणत्या एका धर्माचे नव्हते. त्यामुळे सर्व समाजबांधव, संस्थांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे. कोल्हापुरातील सर्व समाजबांधव एकत्र असल्याचा संदेश सोहळ्याच्या निमित्ताने देशभर जाऊदे.वारकरी समाजाचे महादेव महाराज यांनी मिरवणुकीत २०० वारकरी सहभागी होतील, असे सांगितले. बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी मिरवणुकीत अग्रभागी असतील, असे संघटनेचे शिवमूर्ती झगडे यांनी स्पष्ट केले. बंकट थोडगे यांनी मुस्लिम समाज मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले. धनगरी ढोलांसह समाजबांधव यावेळी येणार असल्याची माहिती बबनराव रानगे यांनी दिली.प्रदूषण व पाणीप्रश्नाचा जागर मिरवणुकीत करावा, अशी सूचना ख्रिश्चन समाजाचे अनंत म्हाळुंगेकर यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांना सामावून घेत, तरुणांसाठी ऐतिहासिक प्रबोधनात्मक व्याख्यानमाला सुरू करावी, असे किशोर घाटगे यांनी सांगितले. अंबाबाई पुजारी नेमणुकीचे फलक मिरवणुकीत असावेत, अशी सूचना रामदास पाटील यांनी केली. चर्मकार समाजाचे अरुण कुºहाडे, लमाण समाजाचे रामचंद्र पोवार, माळी समाजाचे अशोक माळी, नाथपंथी डवरी समाजाचे डॉॅ. राजेंद्र सूर्यवंशी, आदींनी मार्गदर्शन केले.बैठकीसाठी शंकरराव शेळके, अवधूत पाटील, अजय इंगवले, दिलीप सावंत, संजय जाधव, महादेवराव जाधव, संजीवनी देसाई, शैलजा भोसले, उज्ज्वला जाधव, बिना देशमुख, अनुराधा घोरपडे, अशोक कांबळे, शिरीष देशपांडे, भाऊसो काळे, संजय कांबळे, प्रा. पी. एम. पाटील, अशोक पवार, प्रसाद जाधव, गौरव पाटील, विकास जाधव, सी. एम. गायकवाड, आदी उपस्थित होते.मिरवणुकीतप्रबोधनाचा जागरमिरवणुकीत प्रबोधनाचा जागर केला जाणार आहे. साउंड सिस्टीम असणार नाही. व्यसन करणाऱ्यांना मिरवणुकीत प्रतिबंध असेल. मंगळवार पेठेतून ६ जूनला सायंकाळी पाच वाजता शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक निघणार आहे. सोहळा व मिरवणुकीचे सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा होणार लोकोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:30 AM