इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांची निवडणूक दोन आठवड्यांनी असली, तरी उपनगराध्यक्षपदासह सभापतिपदासाठी इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापतींना विशेष महत्त्व येणार असले तरी आचारसंहितेमुळे वर्षाऐवजी आठ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बांधकाम व पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याचीच उत्सुकता आहे.नगरपालिकेमध्ये भाजप, ताराराणी व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आहे. सध्याच्या विषय समित्यांची मुदत ५ जानेवारी २०१९ रोजी संपत असून, त्याचदिवशी समित्यांचे सदस्य व सभापतिपदाची निवडणूक होणार आहे.
सत्तेवर येताना आघाडीमध्ये उपनगराध्यक्षपद कायम ताराराणी आघाडीकडे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे असणाऱ्या पाणीपुरवठा व बांधकाम या दोन समित्या गतवर्षी ताराराणी आघाडीकडे दिल्या जाणार होत्या. मात्र, आणखीन एक वर्ष या दोन्ही समित्या आपल्याकडे राहाव्यात, असा आग्रह राष्ट्रवादीने केल्यामुळे आमदार सुरेश हाळवणकर यांनी संयुक्त बैठक घेऊन या दोन्ही समित्या राष्ट्रवादीकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला.यंदा या दोन्ही समित्या ताराराणी आघाडीकडे येणार असून, ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे उर्वरित आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण या समित्या कोणाकडे जाणार, याचीही उत्सुकता आहे. दरम्यान, ताराराणी आघाडीकडे येणाऱ्या पाणीपुरवठा समितीकडे सुमारे ८० कोटी रुपयांची वारणा नळ योजना, तसेच बांधकाम समितीकडे नगरपालिका इमारतीवरील अडीच कोटी रुपयांचे सभागृह, तसेच पाच कोटी रुपयांचे रस्ते बांधकाम अशी कामे आहेत. याशिवाय आरोग्य समितीकडे ३२ कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे बांधकाम व पाणीपुरवठा बरोबरीनेच आरोग्य समितीसुद्धा प्रतिष्ठेची मानली जात आहे.उपनगराध्यक्षपदासाठी चुरसताराराणी आघाडीकडे असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठीसुद्धा चुरस आहे. सध्या उपनगराध्यक्ष असणाऱ्या सरिता आवळे यांना निवडणुका होईपर्यंत आणखीन मुदतवाढ मिळणार का, हाही एक प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, या पदासाठी ताराराणीमधील दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच स्पर्धा आहे. त्यासाठी संगीता आलासे व इकबाल कलावंत या दोन नावांची चर्चा आहे.