शिरोळ : येत्या १५ जानेवारीला तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, आगामी जि. प., पं. स. निवडणुकांमध्ये फायदेशीर ठरतील अशा मंडळींना गावपातळीवर निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. यासाठी जि. प. व पं. स. सदस्यांचा कस लागणार आहे. हे सदस्य कशी व्यूहरचना आखतात, यावर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या लक्षवेधी ठरल्या आहेत. पक्षापेक्षा गटा-तटाला या निवडणुकीत महत्त्व असल्याने जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून आतापासूनच पॅनेल प्रमुखांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सात जिल्हा परिषद व तेरा पंचायत समिती मतदारसंघात ग्रामपंचातींच्या निवडणुका होत आहेत. दत्तवाड जिल्हा परिषद, तर कोथळी पंचायत समितीची जागा रिक्त आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्याच गटात सरपंचपद असावे यासाठी जि. प. व पं. स.मधील सदस्यांसह नेते तयारीला लागले आहेत. पुढीलवर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पॅनेल प्रमुखांना सोबत घेऊन व्यूहरचना आखण्यासाठी ही मंडळी आघाडीवर आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. ऐनवेळेला ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचा खर्चही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना करावा लागणार आहे. एकूणच गावपातळीवरील सत्तेसाठी राजकीय नेत्यांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
----------------
जि. प., पं. स. पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत दानोळी, यड्राव, शिरोळ, आलास, अब्दुललाट, उदगाव या सहा जिल्हा परिषदा, तर दानोळी, उदगाव, अर्जुनवाड, गणेशवाडी, आलास, नांदणी, यड्राव, शिरढोण, अब्दुललाट, दत्तवाड, टाकळी अशा अकरा पंचायत समिती मतदारसंघांतील सदस्यांचा कस लागणार आहे.